हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज दुदैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद बाब आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या दिशेने सरकारी वकील उज्ज्वल निकल काम करत आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. याचबरोबर उज्ज्वल निकम आणि मी तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारतर्फे पीडितेला वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले. नागपूर तसेच मुंबईतील डॉक्टरांनी देखील सर्व प्रयत्न केले. मात्र दुदैवाने पीडितेला वाचवण्यात अपयश आले. या दु:खद प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील असा विश्वासही अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलातना व्यक्त केला.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची सात दिवसांपासून मृत्यूशी सुरू असेलली झुंज अखेर आज अपयशी ठरली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संतापाची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालायत आठवडाभरापासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर, आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं आहे. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.