मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा जाज्वल्य इतिहास लवकरच डॉक्युमेंटरीच्या स्वरूपात समोर येणार आहे. आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे आणि काही तरुण इतिहास संशोधकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठी माणसाचा इतिहास जगभरातील लोकांना कळावा यासाठी तीन ते चार टप्प्यांत या डॉक्युमेंटरीजची निर्मिती केली जाणार आहे.
   मराठा आरमाराची सुरुवात कशी झाली. कान्होजी आंग्रे कोण होते. ते कुठून आले. ते सरखेल म्हणून कसे ओळखले जाऊ लागले, त्यांनी आरमारांसाठी जहाजांची उभारणी कशी केली. आरमारातील खलाशी आणि सैनिक कोण होते. कोकण किनारपट्टीवर त्यांनी आपले साम्राज्य कसे प्रस्थापित केले. डच, इंग्रज आणि पोतुगीजांशी त्यांनी कसा संघर्ष केला याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. मराठा आरमार आणि कान्होजी आंग्रेंचा इतिहास प्रेरणादायी आहे. तो लोकांसमोर आला पाहिजे या उद्देशाने या डाक्युमेंटरीजची निर्मिती केली जाणार आहे.
केवळ एका भागात या इतिहासाची मांडणी न करता तीन ते चार भागांत विभागवार मांडणी केली जाणार आहे. मराठा आरमारावर गेली सात-आठ वर्षे अभ्यास करणारे आनंद खर्डे आणि प्रितेश खेडेकर डॉक्युमेंटरीजची निर्मिती करणार आहेत. तर आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे त्यांना निर्मिती साहाय्य करणार आहेत. आज कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी अलिबाग इथे ही घोषणा करण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कान्होजी आंग्रेंचा जाज्वल्य इतिहास जतन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे आनंद खर्डे यांनी सांगितले. इंग्लिश आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये या डॉक्युमेंटरीजची निर्मिती केली जाणार आहे. इतिहासाच्या मांडणीसाठी स्केचेसची आणि व्हिडीओजची मदत घेतली जाणार आहे. या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरमाराचा इतिहास मराठी माणसांना आजवर सांगितला गेला आहे. मात्र मराठय़ांच्या आरमाराचा इतिहास जगभरातील लोकांना कळावा याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रितेश खेडकर यांनी सांगितले. युरोपियन राष्ट्रात आपल्या इतिहासाबद्दल लोकांना खूप कुतूहल आहे. ऐतिहासिक घटनांचे संशोधन आणि संवर्धन करणाऱ्या अनेक संस्था इथे कार्यरत आहेत. पण त्यांना आपल्या इतिहासाबद्दल फारशी माहिती संकलित करणे शक्य झालेले नाही. या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून ते शक्य होईल, असा विश्वास खेडकर यांनी व्यक्त केला.
१६९८ ते १७२९ या कान्होजीराजे आंग्रे यांच्या काळातील घटनांचा आणि त्यांच्या पश्चात कुलाबा आणि विजयदुर्ग संस्थानांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.