नागपूर/ चंद्रपूर : समलैंगिकता गुन्हा ठरवणारा दीडशे वर्षांचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द  ठरवल्याने स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून चंद्रपूर व नागपुरात समलैंगिक समूहाने गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

नागपुरात समलैंगिक व्यक्तींनी एकत्रित येऊन १३ वर्षांपूर्वी सारथी ट्रस्ट स्थापन केला. गेल्या तेरा वर्षांत तब्बल साडेसहा हजार व्यक्ती  ट्रस्टचे सदस्य झाल्या. ट्रस्टच्या सदस्यांच्यावतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीचा गणेशोत्सव त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. भारतीय दंडविधानात असलेली ३७७ कलमाची तरतूद  रद्द करण्यात आली आहे. या स्वातंत्र्यानंतर आलेला हा पहिलाच सार्वजनिक उत्सव आहे. यावर्षीची संकल्पना ‘रेनबो’ गणपती अशी असून सीताबर्डीवरील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरातरील सारथीच्या कार्यालयात सध्या उत्सवाची धूम सुरू आहे. ज्या स्वातंत्र्याची आम्ही प्रतीक्षा करत होतो ते मिळाले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी खास आहे, अशी माहिती निकुंज जोशी यांनी दिली.

चंद्रपुरात सप्तरंगी रंगले ‘संबोधन’

चंद्रपुरात संबोधन ट्रस्ट ही समलैंगिकांची संस्था आहे. राज काचोळे याने २०११ मध्ये स्थापन केलेल्या संस्थेचे  ११०० सदस्य असून त्यांनी संस्थेच्या तुकूम कार्यालयात गणेशोत्सव आयोजित केला आहे. ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर यावेळच्या गणेशोत्सवाचे महत्त्व काही वेगळेच आहे असे राजने  ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमासोबतच संस्थेच्या ११०० सदस्यांसाठी प्रा.डॉ.जयश्री कापसे गावंडे यांच्या अध्यक्षतेत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराला समुपदेशक म्हणून निरंजन मंगरूळकर, शारदा लोखंडे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाची एड्स व गुप्तरोग तपासणी केली गेली. संबोधन ट्रस्ट ही संस्था सुरू केली तेव्हा खूप त्रास झाला. लोक आम्हाला संस्थेसाठी जागा देण्यास तयार नव्हते. या कठीण समयी सारथी ट्रस्टचे आनंद चंद्राणी व पवन सर यांच्यासह अनेकांनी मदत केली. त्यातून तुकूम येथे कार्यालय सुरू झालेअसे सांगून राज म्हणाला, आज या संस्थेकडे एमसॅक व पहचान प्रकल्पाचे काम आहे. आजवर आम्ही गुन्हेगार म्हणून जगत होतो, परंतु आता स्वातंत्र्य उपभोगत आहोत.