नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव – विंचूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि ॲपेरिक्षा यांची धडक होऊन, पाच जण ठार झाले. मृतांमध्ये लोणी प्रवरा (अहमदनगर) येथील दोघांचा समावेश आहे.

सायंकाळी ॲपेरिक्षा प्रवाशांना घेऊन निघाली होती. यावेळी समोरून आलेल्या ट्रकशी तिची धडक झाली. या अपघातात सुहास निकाळे (४०, रिक्षाचालक, विंचूर), विठ्ठल भापकर (६५) आणि भाऊसाहेब नागरे (६०, दोघेही लोणी-प्रवरा), किसन बैरागी (६०, धारणगाव खडक), रतन गांगुर्डे (४०, इंदिरानगर, विंचूर) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्तांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, चार जणांचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.