देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरिकांना मॉडर्नाची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे? जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

देशात लसीचा तुटवडा असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. केंद्र सरकारने भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्युट आणि स्फुटनिक या कंपन्यांच्या लसींना परवानगी दिली आहे. असं असताना या देशात आणि मुंबईच्या आजूबाजूला मॉडर्ना कंपनीच्या लसीचं लसीकरण सुरू आहे अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

परदेशी दुतावासातल्या विशेषतः फ्रान्समधल्या नागरिकांना Moderna ची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. दुतावासातील नागरिकांच्या भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत असल्याचं मलिक यांनी सांगितलं आहे.

तीनच कंपन्यांना परवानगी असताना मॉडर्नाची लस कशी काय दिली जात आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे तसंच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणं आवश्यक असल्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांचं लसीकऱण काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं.