शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीसह नकाणे तलावातून हनुमान टेकडी जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत असलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी गळत असून, एका ठिकाणी तर जलवाहिनीच फोडण्यात आली आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असा अनुभव धुळेकरांना घ्यावा लागत आहे. गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून महापालिका प्रशासनाने तापी योजनेवरील सहापैकी तीन ठिकाणी गळती थांबविण्यात यश आल्याचा दावा केला आहे. साक्री तालुक्यातील धरणांमधून कालव्याद्वारे वाहून आणलेले पाणी कुठल्याही स्थितीत वाया जाऊ देऊ नये, अशी अपेक्षा धुळेकर करीत आहेत.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. पाण्यासाठी गावोगाव भटकंती होत असताना धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावापासून हनुमान टेकडी जलकुंभापर्यंत टाकलेल्या वाहिनीला गळती सुरू झाली आहे. पुलाच्या खाली नाल्याच्या काठावरच जलवाहिनी फुटल्याने नकाणे तलावातून येणारे पाणी मोठय़ा प्रमाणात वाहून जात आहे. ही गळती रोखण्याचे आव्हान असतानाच तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतूनही पाच ते सहा ठिकाणी गळती सुरू झाली. यापैकी तीन ठिकाणची गळती बंद करण्यात आली असून, हनुमान टेकडी केंद्रावर पाणी वाहून आणणाऱ्या जलवाहिनीची गळती थांबविणे शक्य नसल्याने नवीन पाइप मागविण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्राने दिली. सध्या तापी पाणीपुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलाव या ठिकाणाहून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा होत आहे. शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. नळांना तोटय़ा बसविणे, गळती थांबविणे, रोजच्या वापरात काटकसर करणे, आवश्यक तेवढेच पाणी साठविणे, असे पर्याय टंचाईवर मात करण्यासाठी अवलंबले जात आहेत.