एकरूख उपसा सिंचन योजनेची तऱ्हा

अक्कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यास उजनी धरणाचे पाणी मिळण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या एकरूख उपसा सिंचन योजनेची उभारणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. यात दोन टप्पे पूर्ण झाले असून  केवळ वीज जोडणी होणे शिल्लक आहे. त्यासाठी अवघ्या एक कोटी निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध झाला असता तर या योजनेच्या दोन्ही टप्प्यात उजनी धरणाचे पाणी आले असते व सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असते. पर्यायाने सुमारे शंभर कोटींचे शेती उत्पन्न मिळाले असते. परंतु लालफितीचा कारभार नडत असल्याचे दिसून येते.

१९९५-९६ साली तत्कालीन युती शासनाच्या कार्यकाळात कृष्णा खोरे विकास मंडळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्य़ात उजनी धरणाचे पाणी सर्वदूर पोहोचण्याच्या हेतूने विविध उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एकरूख उपसा सिंचन योजना होय. मूळ प्रकल्पीय सिंचनक्षमता २४ हजार ५८० हेक्टर क्षेत्र असलेल्या या योजनेत अक्कलकोटसासाठी १५ हजार १०० हेक्टर तर दक्षिण सोलापूरसाठी ७२०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामुख्याने या दोन तालुक्यावर भर दिला गेला आहे.  १९९५-९६ सालच्या दरसूचीनुसार एकरूख उपसा सिंचन योजनेची किंमत ८७ कोटी ४८ लाखांची होती. मात्र त्यावरील खर्च वाढत जाऊन मागील २०१५-१६ सालच्या दरसूचीनुसार या योजनेची किंमत वाढून ४३८ कोटी ५१ लाखांची झाली आहे. आतापर्यंत योजनेवर १२९ कोटी ६९ लाखांचा निधी खर्च झाला आहे. पाणी वितरण व्यवस्था उभारण्यासाठी मागील २०१६-१७ साली २० कोटी तर चालू २०१७-१८ साली २२ कोटी याप्रमाणे एकूण ४२ कोटींचा निधी उपलब्ध झाला खरा; परंतु लालफितीच्या कारभारामुळे हातात असलेला हा निधी खर्च होऊ शकत नाही. या निधीच्या खर्चासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता राज्य तांत्रिक समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असता त्यास हिरवा कंदील मिळून शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी गेला खरा; परंतु हे प्रकरण शासनाकडे अद्यापि प्रलंबित आहे. त्यामुळे ४२ कोटींचा निधी अखर्चित आहे.

एकीकडे ४२ कोटींचा निधी अखर्चित असतानाच दुसरीकडे एकरूख उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक १ व २ ची कामे पूर्ण झाली आहेत. यात स्विचयार्ड ते पंपहाऊसपर्यंत केवळ वीजजोडणी होणे बाकी राहिले आहे. त्यासाठी संबंधित पंपपुरवठाधारकाला एक कोटीची रक्कम देय आहे. ही रक्कम अदा झाली असती तर वीजजोडणी पूर्ण होऊन सध्याच्या आहे त्या स्थितीत उजनी धरणाचे पाणी या योजनेत आले असते. यातून दक्षिण सोलापूुर तालुक्यातील हणमगाव, होटगी, रामपूर येथील तलाव भरून घेता आले असते व पर्यायाने हे पाणी सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्राला मिळाले असते. हे या क्षेत्राला सिंचन उपलब्ध झाले असते तर तेथील शेतीचे हेक्टरी उत्पन्न हमखास वाढून ते सुमारे शंभर कोटींपर्यंत गेले असते, असे जाणकार मंडळी सांगतात.

यासंदर्भात यंत्रणेशी संबंधित उजनी कालवा क्रमांक ८ चे कार्यकारी अभियंता बी. एस. बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. एकरूख उपसा सिंचन योजनेवर प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मागील आर्थिक वर्षांतील आर्थिक तरतुदीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च करण्यासाठी शासनाची परवानगी मिळणे आवश्यक आहे.  योजनेचा प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनाकडे गेल्या वर्षी जून-२०१६ मध्ये सादर झाला होता. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. टप्पा क्रमांक १ व २ ची कामे पूर्ण झाली असून केवळ वीजजोडणीसाठी एक कोटींची रक्कम संबंधित कंत्राटदाराला द्यावयाची आहे. ही रक्कम मिळाली असती तर वीजजोडणी होऊन उजनी धरणाचे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती ओलिताखाली येणे शक्य होते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे बिराजदार यांनी नमूद केले.