मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर पोलीस खात्याने अनधिकृतपणे पोलीस चौकी उभारून शौचालय सुरू केल्याने बांदा येथील शिवसैनिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. इन्सुली-शेर्ले येथे उभारलेली चौकी बेकायदेशीर आहे, असे बांधकाम खात्याने कळवूनही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेतली नसल्याने शिवसैनिकांत नाराजी आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचा झारापने पत्रादेवीपर्यंतचा १९ कि. मी. रस्ता चौपदरीकरण करण्यात आला आहे. या चौपदरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर बांदा-इन्सुली-शेर्ले या रस्त्यावर दुभाजकाजवळ पोलिसांनी चौकी उभारून शौचालय सुरू केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जून १७) च्या रस्ता दुभाजकावर बांदा तुकसान ब्रिज येथे रस्ता दुभाजकावर पोलीस चौकीचे व शौचालयाचे पक्के बांधकाम केले आहे.

त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाची पूर्व परवानगी घेण्यात आली नाही, असे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता रत्नागिरी विभागाने शिवसेना बांदा उपविभागप्रमुख संजय अहिर यांना कळविले.
महामार्गावर अथवा महामार्गाच्या दोन्ही बाजूस ४० मीटर अंतराच्या आत राष्ट्रीय महामार्ग खात्याची रीतसर प्रस्ताव सादर करून परवानगी घेतल्याखेरीज कोणतेही बांधकाम करण्यास शासनाची परवानगी अथवा मान्यता नाही, असे केलेले बांधकाम हे अनधिकृत बांधकाम म्हणून गणले जाते ते पाडण्यात येते व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येतो, असे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना कळवूनदेखील त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग पोलीस विभागाने मनमानी करीत अनधिकृतपणे उभारलेली चौकी राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढली नाही. सर्वसामान्यांची घरे, स्टॉल अतिजलद कृतीने काढणाऱ्या विभागाने हलगर्जीपणा दाखविल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग व पोलीस खात्याच्या संगनमताने अनधिकृतपणे उभारलेल्या चौकीबाबत चौकशी करून शेड बाजूला करावी या मागणीसाठी बांदा शिवसेना विभागप्रमुख संजय अहिर, उपतालुकाप्रमुख भय्या गोवेकर, यांनी बेमुदत उपोषण राष्ट्रीय महामार्गाच्या येथील कार्यालयाच्या समोर सुरू केले आहे. या बेमुदत उपोषणात अजय सावंत, बाळ वाळके, अजित सांगेळकर, गिरीश नाटेकर, उल्हास सावंत, मणियार व इतरांनी पाठिंबा दिला आहे.