साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे.

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….,”

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

किरीट सोमय्यांनी दिली होती जरंडेश्वर कारखान्याला भेट

भाजपा नेते किरीट सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर बुधवारी सकाळी दाखल झाले होते. यावेळी सभासदांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. किरीट सोमय्या यांनी यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल असं सांगितलं होतं.

कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बऱ्याच सभासदांनी कारखाना सभासदांच्या ताब्यात यावा अशी प्रमुख मागणी किरीट सोमय्या यांच्याकडे केली. कारखाना चांगला सुरु होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्रही मोठे होते. मात्र त्यावेळी कारखाना कवडी मोल भावाने कारखान्याचा व्यवहार केला. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. सत्तेच्या जोरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आलाय. पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांचा व्हावा. तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही काही करा कसेही करा आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या अशी मागणी सोमय्यांकडे जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांनी कारखाना स्थळावरच केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकरी सभासदांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर किरीट सोमय्या आल्यानंतर घेराव घातला.

“हिंमत असेल तर…,” अजित पवारांना दिलं होतं आव्हान

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काही शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात घेतलेल्या भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण हे जाहीर करावे. त्यांनी एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा असे आव्हान सोमय्या यांनी दिलं होतं. कोणताही कारखाना अडचणीत येऊ शकतो. त्याला सरकारने मदत करायला पाहिजे. मात्र अनेक बेनामी कंपन्यांमधून संशयास्पद व्यवहार करून हा कारखाना अजित पवार यांनी कारखाना घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हा कारखाना माझा असल्याचे त्यांनी जाहीर करावे त्यांनी असे आव्हानही त्यांनी दिलं होतं.

ईडीकडून करण्यात आली होती जप्तीची कारवाई

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अजित पवारांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ या कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालयाने जप्तीची कारवाई केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याच्या ६६ कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर जप्ती आणण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्राकडून देण्यात आली होती. जरंडेश्वर सहकारी कारखाना २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला होता. तेव्हा समर्पित किमतीपेक्षा कमी दराने हा कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली होती.

जरंडेश्वार सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी केला होता. या कंपनीने हा कारखाना लगेचच जरंडेश्वर शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कंपनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा आहे. स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेण्यासाठी गुरू कमो़डिंटी या बेनामी कंपनीचा वापर करण्यात आला होता. या कारखान्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून ७०० कोटींचे कर्ज घेतल्याचेही ईडीला आढळून आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्रकुमार घाडगे याच्या मालकीचा हा कारखाना आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ही कारवाई केली असल्याची माहिती जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा व माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी दिली होती. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा घाडगे यांनी खरेदी केला होता. लिलाव प्रक्रियेला माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील रकमेतून हा कारखाना अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने आपल्या ताब्यात घेतला होता. त्या विरोधात ईडीने कारवाई केली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीने कमी दरात खरेदी के लेल्या सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.