कोल्हापुरातील कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. हसन मुश्रीफ यांचे घर आणि साखर कारखाने या ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. त्यांच्या साडूच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारला आहे. तसेच पुण्यात त्यांच्या मुलाचे घर आहे त्या ठिकाणीही आयकर विभागाने छापा मारला आहे.

मुश्रीफ हे काल मुंबईत होते. सकाळी ते कागल मधील निवासस्थानी पोहचले.काही वेळातच ७-८ इनोव्हा मोटारीरून प्राप्तिकर विभागाचे पथक घरी पोहचले. ३०-४० जणांच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे. सांगली, सोलापूर,सातारा,ठाणे जिल्ह्यातील वाहनातून पथक आले आहे. स्थानिक बंदूकधारी पोलीस , महिला पोलीस, स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने तेथे बंदोबस्त करीत आहेत. घराचा दरवाज बंद केला असून कोणालाही आत सोडले जात नाही. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याने कागल शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राजकीय संदर्भाची चर्चा
सत्ताधाऱ्याकडून विरोधकांची कोंडी केली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या घर , साखर कारखाना, नातेवाईक आदी ठिकाणी घातलेला छापा राजकीय स्पर्श असलेला आहे का, अशी चर्चा समाज माध्यमातून सुरू आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्याला मुश्रीफ यांनी नकार दिला होता. या घटनेला आठवडा होण्यापूर्वच ही कारवाई करण्यात आली असल्याने त्याची चर्चा सुरू आहे.