किराणा दुकाने व भाजीपाला विक्री बंदच राहणार

नगर : करोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर नगर शहरातील कडक निर्बंधाची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. हे निर्बंध आता आणखी पाच दिवस, म्हणजे दि. १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भातील आदेश आज, सोमवारी दुपारी जारी केले. या आदेशामुळे किराणा दुकाने व भाजीपाला विक्री १५ मेपर्यंत बंदच राहणार आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची संख्या नगर शहरात आहे. बाधित नागरिक कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याऐवजी गृहविलगीकरणातच राहत आहेत. याबरोबरच बाजारात मोठी गर्दी होत असल्याने राज्य सरकारच्या निर्बंध व्यतिरिक्त मनपा आयुक्त गोरे यांनी स्वतंत्र आदेश जारी करत किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीसह बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले.

यापूर्वीही निर्बंध दि. २ मे ते १० मे दरम्यान लागू करण्यात आले होते. परंतु तरीही शहरातील बाधितांच्या संख्येत घट झालेली नाही. त्यामुळे हे निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार किराणा दुकाने व अनुषंगिक मालाची विक्री, भाजीपाला व फळे खरेदी व विक्री, सर्व खासगी आस्थापना तसेच अंडी, मटण, चिकन व मत्स्य विक्री बंद राहील तर वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, अत्यावश्यक सेवेसाठी सर्व पेट्रोल पंप नियमित वेळेत, घरपोच गॅस वितरण, सर्व बँका, दूध व दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्याची विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहील.

ज्येष्ठांसाठी आज व उद्या दुसरा डोस

दरम्यान गेल्या १५ दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी बंद असलेला दुसरा डोस उद्या,मंगळवारपासून शहरातील सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू होत आहे. मात्र १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना नोंदणी करून दिला जाणारा पहिला डोस संपल्याने त्यांचे लसीकरण होणार नाही. ज्येष्ठांसाठी कोवॅक्सिनचा दुसरा डोस उद्या, मंगळवारी सर्व केंद्रांवर तर कोविशिल्डचा दुसरा डोस बुधवारी सर्व केंद्रांवर दिला जाणार आहे, महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. शहरातील माळीवाडा, बुरुडगाव रस्ता, केडगाव, मुकुंदनगर, नागापूर व सिव्हिल हडको आरोग्य केंद्रांवर ही व्यवस्था करण्यात आली आहे.

अँटीजेन चाचणीसाठी फिरता दवाखाना

महापालिका व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने शहरात ‘अँटीजेन’ चाचणीसाठी फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. यामार्फत रोज ५०० जणांच्या अँटीजेन चाचण्या केल्या जातील. त्याची सुरुवात आज, सोमवारी बोल्हेगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी तातडीने चाचण्या करून घेण्याचे आवाहन आ. जगताप व महापौर वाकळे यांनी केले.