जागतिक वारसास्थळ नोंदी व विकासासाठी आता स्वतंत्र कायद्यासह नॅशनल हेरिटेजची स्थापना केली जाणार आहे. या यादीत विज्ञानाचे जागतिक ज्ञानतीर्थ असलेल्या लोणार सरोवर परिसराचा समावेश केला जाणार आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे डेहराडून येथील अधिष्ठाता डॉ. विनोद माथूर यांनी केंद्र सरकार व युनेस्कोकडे असा प्रस्ताव सादर क रून त्याबाबत आग्रह चालविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नॅशनल हेरिटेजच्या स्थापना श्री गणेशालाच लोणारला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास बुलढाणा जिल्हा व लोणार सरोवर परिसर जागतिक पर्यटन नकाशावर झळकणार आहे. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनचे अधिष्ठाता डॉ. विनोद माथूर यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मंजुरी दिली आहे. त्यात पश्चिम घाटातील ३९ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र जागतिक वारसा स्थळ म्हणून लोणार सरोवर अजूनही वंचित आहे. लोणार सरोवर हे ज्ञानविज्ञानाचे तीर्थक्षेत्र आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खगोल व भूगर्भशास्त्रीय महत्व असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर येथे आहे. विविध प्रकारची खनिजे, क्षार व खडकांचे प्रकार येथे आढळतात. सरोवराच्या निर्मितीचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. भूगर्भशास्त्रीय आघात किंवा भूकंप की उल्कापाताने हे सरोवर निर्माण झाले, याबद्दल सभ्रंम आहे. असे असले तरी लोणार जागतिक आश्चर्य व प्रमुख पर्यटन केंद्र आहे.
केंद्र शासन, राज्य शासन, पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, वनविभाग याकडून या सरोवराकडे प्रचंड दुर्लक्ष केले जाते. सरोवराचे जागतिक व पर्यटकीय महत्त्व डॉ. विनोद माथूर यांच्या लक्षात आले आहे. त्यांनी केंद्र शासन व पुरातत्व विभागाला या स्थळाला जागतिक वारसा केंद्र म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव पाठविला आहे. युनेस्कोकडेही ते याचा पाठपुरावा करीत आहेत. माथूर यांच्या प्रयत्नानेच जागतिक वारसा स्थळाच्या संदर्भात त्यांच्या जतन व विकासासाठी एक कायदा अस्तित्वात येणार आहे. कायद्यातील तरतुदीनुसार नॅशनल हेरिटेज या संस्थेची स्थापना केली जाणार आहे. या संस्थेअंतर्गत सर्व जागतिक वारसा स्थळे येणार आहेत. लोणारचाही या संस्थेत समावेश होणार आहे.
लोणारला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यासाठी जिल्ह्य़ातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनीही राज्य, केंद्र सरकारकडे व जागतिक पातळीवर युनेस्कोकडे अधिक पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रीय वारसा’त लोणार सरोवराचा समावेश ?
जागतिक वारसास्थळ नोंदी व विकासासाठी आता स्वतंत्र कायद्यासह नॅशनल हेरिटेजची स्थापना केली जाणार आहे. या यादीत विज्ञानाचे जागतिक ज्ञानतीर्थ असलेल्या लोणार सरोवर परिसराचा समावेश केला जाणार आहे.

First published on: 04-12-2012 at 06:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent law with national heritage to be launched to register the heritage place