राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. या धमकी प्रकरणाची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “सौरभ पिंपळकर नावाच्या ट्वीटर अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये (वैयक्तिक माहिती) भाजपाचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. पण, तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का? याची माहिती नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, तो (शरद पवारांना धमकी देणारा) भाजपा कार्यकर्ता आहे असं तो म्हणतोय. अलिकडे ट्विटरवर असे काही लिखाण करणाऱ्यांना, अशा ट्विटर हँडल्सना मोठमोठे लोक फॉलो करतात आणि प्रोत्साहन देतात. त्यामुळे अशा प्रवृत्त्या वाढवून अशा प्रकारचं राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात आणि देशात सुरू आहे. परंतु आपलं राज्य पुरगोमी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सुजाण आहे. त्यामुळे जाणीवपूर्वी हे चाळे कोण करतंय हे राज्याला आता कळू लागलंय.




जयंत पाटील म्हणाले, अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या पाहिजेत. या घटनेकडे सोशल मीडियावरचं लिखाण समजून साधी किंवा हलकी कलमं लावून त्या व्यक्तीला सोडून देण्याचा प्रयत्न कृपा करून कोणीही करू नये. त्यांना शिक्षा देण्याचं प्रयोजन सरकारने करावं.
शरद पवारांवर होत असलेल्या टीकेवर आणि सत्ताधाऱ्यांनी केलेली औरंगजेबाशी तुलना याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, पवार साहेब जे बोलले नाहीत, ज्याबद्दल अजिबात त्यांनी भाष्य केलं नाही, अशा खोट्या बातम्या तयार करून प्रसारमाध्यमात देणं, त्यावर पुन्हा अनेकांनी बोलणं आणि मुद्दाम पवारांना लक्ष्य करणं हा प्रकार सध्या सुरू आहे. कारण पवार हे विरोधी पक्षांचं शक्तीस्थळ आहे. त्यांना नामोहरम करणं आणि राज्यातल्या युवकांना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या प्रवृत्तीचे लोक करत आहेत.
हे ही वाचा >> शरद पवार, संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
जयंत पाटील म्हणाले, औरंगजेबाजा पुळका कोणालाच नाही, राज्यातल्या जनतेप्रमाणे आम्हा सर्वांच्या भावनाही त्याच आहेत. परंतु काही लोकांचे लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न संपले आहेत, त्यामुळे निवडणुकांच्या आधी हे लोक या मार्गाला लागले आहेत.