आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची बैठकांची सत्रं आणि चर्चा चालू आहेत. या आठवड्यात मविआ नेत्यांच्या दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. मविआ नेत्यांची आजही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मविआमधील प्रमुख नेत्यांच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीदेखील हजर होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मविआकडे लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २७ जागांची मागणी केली आहे. यावर आता मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मविआची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत भाजपाला पराभूत करणं आणि देशाचं संविधान वाचवणं हे एकच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोणी किती जागा मागितल्या, किती दिल्या, किती घेणार वगैरे या गोष्टींवर फारसा भर दिला जात नाही. आमची सर्वांची एकच मासनिकता आहे की, कुठल्याही परिस्थितीत भाजपाला पराभूत करायचं आहे आणि देशाचं संविधान वाचवायचं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर) यांची भूमिका आमच्यासारखीच आहे.

वंचित बहुजन आघाडीने मविआकडे तब्बल २७ जागा मागितल्या आहेत, आचारसंहिता लागायला अवघे १० ते १२ दिवस शिल्लक असताना इतकी अवाजवी मागणी करून प्रकाश आंबेडकर दबावतंत्राचा वापर करत आहेत का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला. त्यावर आव्हाड म्हणाले, अजिबात नाही! प्रकाश आंबेडकर त्या मताचे बिलकूल नाहीत. भाजपाला हरवणं आणि संविधान वाचवणं हीच आमची आणि त्यांचीही भूमिका आहे. बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेपासून लांब जाणार नाहीत. शेवटी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत.

हे ही वाचा >> “…तर राजकारण सोडून घरी बसेन”, शिवाजीराव अढळरावांचा उल्लेख करत दिलीप मोहितेंचा अजित पवारांना इशारा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांच्या आजोबांनी लिहिलेलं संविधान भाजपा नष्ट करत असेल तर आंबेडकर स्वस्थ कसे बसतील. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करू. लोकशाहीत वाटाघाटी होत असतात. अशा प्रकारची मागणी करणं चुकीचं नाही. यावर महाविकास आघाडीतले प्रमुख नेते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही सगळी मंडळी निर्णय घेतील.