आपल्या देशात एकाच पक्षाने ६५ वर्षे सत्ता उपभोगली. मात्र त्या पक्षाने जम्मू आणि काश्मीर येथील जनतेला कधीही सन्मानाने जगता यावं म्हणून प्रयत्न केले नाहीत. अशी घणाघाती टीका भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी पुण्यात केली.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी कौतुक केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या जनतेला सन्मानाने जगता यावे म्हणून अनुच्छेद ३७० रद्द केलं. यामुळे काश्मिरी जनेतत आनंदाचे वातावरण आहे. तेथील भागाचा विकास होणार आहे असेही नड्डा यांनी स्पष्ट केले. ” ६५  वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाने अनुच्छेद ३७० बाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे अनेक पिढ्यांचं नुकसान झालं यासाठी देशातली ‘परिवार पार्टी’ जबाबदार आहे” असं म्हणत नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

भारतीय जनता पार्टीचा पाश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, सांगलीचे खासदार संजय पाटील, राज्यसभा खासदार पुणे शहर भाजप अध्यक्षा माधुरी मिसाळ तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जे.पी.नड्डा म्हणाले की, ” आपला देश एकसंध राहावा, या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर येथील अनुच्छेद ३७० हटवले.  यामुळे काश्मीरच्या जनतेला भविष्यात नवीन उद्योग, उच्च शिक्षण, तरुणाच्या हाताला रोजगार यासह अनेक गोष्टींचा लाभ मिळणार आहे” असेही प्रतिपादन त्यांनी केले.

“काँग्रेसच्या काळात हजारो कोटींचा घोटाळे झाले. यामुळे देशाचा विकास झाला नाही. पण देशाचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आल्यावर देश प्रगतीपथावर गेला आहे. आपल्या देशाची मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात उंचाविण्याचे काम झाले असून ते अनेक देशांचे दौरे करीत आहे. यामुळे अनेक देशांसोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबध झाले आहेत. भविष्यात अनेक उद्योग देशात येतील” असेही त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, “ज्या पक्षांनी आजवर सत्ता भोगली. त्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी सत्तेमध्ये असताना केलेल्या घोटाळ्यामुळे आता ईडी, सीबीआय या चौकशीच्या फेर्‍याना सामोरे जात आहे. यामुळे त्यांची काय अवस्था झाली आहे.” अशा शब्दात काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर सडकून टीका केली.

देशातील सर्वसामान्य कार्यकर्ता ते पंतप्रधान होण्याची संधी देण्याचे काम केवळ भारतीय जनता पार्टीने केले आहे. यातून कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केवळ भाजप करू शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश पाहू शकतो आहे. भाजपाची ही कार्यपद्धती आहे. हा पक्ष मुलगा, मुलगी, जावई यांच्याभोवती फिरणारा पक्ष नाही. असा एकच पक्ष देशात आहे असे म्हणत त्यांनी गांधी कुटुंबावरही निशाणा साधला.