मराठी भाषा गौरव दिनाच्यानिमित्ताने आज राज्यभर मराठी भाषेचा गौरव केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आजच्या खासदिनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा ही केवळ मनोरंजनाची भाषा न ठेवता ज्ञानाची भाषा बनवण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे.

“सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा”, असं राज ठाकरे म्हणाले.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

“मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात. पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील”, असं आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा >> मराठीसाठी झटणाऱ्या वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव का स्वीकारले?

विविध क्षेत्रातील माहिती रंजकपद्धतीने समाज माध्यमांवर यावी

“मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे, पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अभ्यास उत्तम आहेच आणि फक्त त्यांचं ज्ञान, माहिती ही जर रंजक पद्धतीने त्यांनी ह्या समाज माध्यमांवर सांगितली तर? विकिमीडिया फाउंडेशनचं, ‘विकिपीडिया’ तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. ह्याच विकिमीडिया फाउंडेशनच्या ‘विकिसोर्स’, ‘विकीमीडिया कॉमन्स’, ‘विकिव्हॉयेज’, ‘विकिस्पिशिज’ सारख्या आभासी मंचांचा वापर ज्ञान मराठीतून देण्यासाठी करणं सहज शक्य आहे. विकिमीडियासारख्या आभासी मंचावर तर ध्वनी, चित्रफीत स्वरूपात पण ज्ञान माहिती प्रसारित करणं शक्य आहे. ह्या सगळ्याचा मुक्त आणि प्रभावी वापर व्हायला काहीच हरकत नसावी. (विकिपीडिया हा ‘प्लॅटफॉर्म’ आहे पण त्याला ‘आभासी मंच’ शब्द वापरला आहे, असे पर्यायी शब्द पण प्रचलित व्हायला हवेत.)”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्ल्यूअन्सर्सचा सत्कार केला होता. पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजमाध्यमांवर मराठी ही ज्ञानाची भाषा बनवणाऱ्यांचा सुद्धा योग्य आदर व्हायला हवा. ह्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच! पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”, असं राज ठाकरे म्हणाले.