राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात सोमवारपासून संघासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरूवात झाली. येत्या विजयादशमीला म्हणजे ११ ऑक्टोबरपासून संघाचे कार्यकर्ते नव्या गणवेशात दिसणार आहेत. नव्या गणवेशानुसार आता संघाचे कार्यकर्ते खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये दिसणार आहेत. मार्च महिन्यात झालेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता संघाच्या मुख्यालयात नव्या गणवेशांची विक्री करण्यात येत आहे. यामध्ये २० ते २४ इतक्या कंबरेच्या मापाच्या ट्राऊझर पँटसाठी २५० रूपये, तर त्यानंतर प्रत्येक वाढीव दोन इंच मापाच्या पँटसाठी अतिरिक्त १० रूपये भरावे लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार संघाने १० हजार गणवेश बनविण्याची ऑर्डर दिली होती. तसेच संघाच्या स्वयंसेवकांना बाहेरून पँट शिवून न घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संघाकडूनच सर्व स्वयंसेवकांना गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती संघातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्यातील इतर संघ शाखांना मागणीप्रमाणे गणवेशांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.
संघाने १९४० मध्ये गणवेशात अंशत बदल केला होता. यापूर्वी खाकी रंगाचा सदरा आणि खाकी रंगाची हाफ पँट असा गणवेश होता. मात्र, १९४० मध्ये त्यात बदल करून पांढऱ्या रंगाचा सदरा व खाकी हाफ पँट असा गणवेश करण्यात आला. तर १९७३ मध्ये चामडय़ाच्या बुटांची जागा रेक्झिन बुटांनी घेतली.
RSS starts sale of their new uniform at Nagpur Headquarters. pic.twitter.com/QEUax3NMl7
— ANI (@ANI) August 29, 2016