चिपळूण येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून निसर्गरम्य कोकणचे दर्शन घडणार आहे. कोकणची सर्वागीण माहिती देणारी ही स्मरणिका सर्वानी आपल्या संग्रहामध्ये ठेवावी, अशी करण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे.
आपल्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणारे चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. त्यामुळे स्मरणिकेमध्ये ग्रंथालयाचा सचित्र इतिहास आणि भावी प्रकल्प याविषयीची माहिती देणारे स्वतंत्र दालन असेल. संस्कृतच्या अध्यापक डॉ. रेखा देशपांडे या स्मरणिकेचे संपादक म्हणून काम पाहणार आहेत. या स्मरणिकेचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या रत्नांना समर्पित या स्मरणिकेचे ‘रत्नवंती’ असे नामकरण करावे, असे विचाराधीन असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.
प्रकाश देशपांडे म्हणाले, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत, कवी माधव, आनंदीबाई शिर्के, कवी आनंद, नाटककार मामा वरेरकर, ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे, सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई या ज्येष्ठांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा स्मरणिकेमध्ये समावेश आहे. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांचा कोकणच्या इतिहासावरील लेख आणि मुस्लिम स्त्रीगीते या विषयावर जमिला दळवी यांचा लेख असेल. वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळित यांचा, तर कोकणातील वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास या विषयावर शिरीष दामले यांचा लेख आहे. कोकणातील मुस्लिम समाज हा विषय अब्दुल कादर मुकादम यांच्या लेखातून उलगडेल.
कोकणाने महाराष्ट्राला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, रियासतकार सरदेसाई, ग. ह. खरे, वि. गो. खोबरेकर, वासुदेवशास्त्री खरे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, वा. वि. मिराशी अशी नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या इतिहास संशोधकांची परंपरा दिली. या परंपरेचा मागोवा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महर्षी धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, संस्कृत पंडित डॉ. पां. वा. काणे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते गोविंद वल्लभ पंत या पाच भारतरत्नांच्या कार्याची माहिती या स्मरणिकेतून मिळणार आहे. ‘हंस’ मासिकाचे संपादक अनंत अंतरकर जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याविषयीचा लेख अनुराधा औरंगाबादकर लिहिणार आहेत, असे प्रकाश देशपांडे यांनी सांगितले.
समारोपाला तीन सत्कार
साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रामध्ये ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर, पाथरवट समाजातील ‘दगडफोडय़ा’ या पहिल्या आत्मचरित्राचे लेखक रामचंद्र नलावडे आणि परचुरे प्रकाशन मंदिरचे अप्पा परचुरे या तीन मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश देशपांडे यांनी दिली.