साहित्यिक, नाटय़कर्मी आणि इतिहासाचे अभ्यासक मुरलीधर खैरनार हे येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या अभ्यासवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने यंदापासून एक लाख रुपयांची अभ्यासवृत्ती देण्यात येणार असून, या वर्षी सर्जनशील लेखनासाठी ती नाशिकचे खैरनार यांना जाहीर करण्यात आली आहे. हौशी रंगभूमीवर १९७५ ते ८५ या कालावधीत ५० पेक्षा अधिक एकांकिका व नाटकांचे दिग्दर्शन, अभिनय, नाशिकमधून चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती करून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात ४०० पेक्षा अधिक प्रयोग अशी खैरनार यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या स्थानिक शाखेचे खजिनदार व कार्यवाह म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली आहे. नाटय़ परिषदेच्या अखिल भारतीय नियामक मंडळावरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. ११ वर्षे पत्रकारिता, १८ माहितीपटांची निर्मिती केली. १९७६ मध्ये आणीबाणीविरुद्धच्या सत्याग्रहात सहभाग व तुरुंगवास, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हाप्रमुख, १९८५ ते ८७ या कालावधीत शेतकरी संघटनेचे पूर्णवेळ काम, असा त्यांचा राजकारणाशीही संबंध आला. गेल्या १० वर्षांपासून ते अभ्यासशास्त्र या विषयावर महाराष्ट्रभर ‘सो सिंपल’ या नावाचा कार्यक्रम करीत आहेत. अलीकडेच ‘इव्हेंट’ ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. प्रतिष्ठानच्या अभ्यासवृत्तीचा कालावधी एक वर्षांचा असून प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर, साहित्यिक व नाटककार जयंत जाधव आणि प्रा. मंगला आठलेकर यांच्या समितीने खैरनार यांची निवड केली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने अभ्यासवृत्ती समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कडेपूरकर व कार्यवाह लोकेश शेवडे यांनी समितीस सहाय्य केले.