scorecardresearch

पर्यावरण संवर्धनाबाबत जागृत होऊया, स्वतःला शिस्त लावूया!; अजित पवारांचा निर्धार

अजित पवार यावेळी म्हणाले, “आपण सर्वजण वन, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया.”

पर्यावरण संवर्धनाबाबत जागृत होऊया, स्वतःला शिस्त लावूया!; अजित पवारांचा निर्धार
(Photo : File)

वटवृक्षाचं पूजन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (१ ऑक्टोबर) राज्याच्या वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते. अजित पवार यावेळी म्हणाले, “वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वजण वन, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया.”

“आपल्या आजीबाजूचा निसर्ग, डोंगर, झाडं, जंगलातील प्राणी-पक्षी, नद्या-नाले, ओढे, झरे, विहिरी, समुद्र यांसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण करण्याचा निर्धार आज आपण मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने करूया. कटिबद्ध होऊया. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. निसर्गाच्या हानीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जनजागृती करूया. त्यासाठी स्वतः जागृत होऊया, स्वतःला शिस्त लावूया”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. 


शाळांमध्येही ‘या’ विषयांचा समावेश करूया!

“जर पुढच्या जूनपासून शाळांमध्ये जे धडे आपण मुलांना देतो त्यामध्ये पर्यावरण संवर्धन-संरक्षणाच्या मुद्द्याचा  अंतर्भाव केलाच गेला पाहिजे अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले तर लहानपणापासून मुलांवर तसे संस्कार होतील. त्यांच्या ज्ञानात मोठी भर पडेल”, असं देखील अजित पवार यांनी यावेळी सुचवलं आहे. 


लहानपणापासूनच आमच्यासाठी हा विषय जवळचा!


मंत्री आदित्य ठाकरे याविषयी बोलताना म्हणाले, “आमच्या घरी सर्वांच्या आवडीचे विषय वेगवेगळे आहेत. माझा भाऊ म्हणजेच तेजसचा कल वनाशीसंबंधित विषयांकडे जास्त आहे. तर मी वातावरणातील बदल आणि पर्यावरण या विषयांकडे अधिक लक्ष देऊन असतो. आमचे वडील हे दोन्हीकडे बॅलन्स करत असतात. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की, जंगलाशी संबंधित विषयांची आवड ही आमच्या सर्वांमध्येच सुरुवातीपासून आहे. माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांना देखील या विषयांची प्रचंड आवड होती. त्यामुळे, लहानपणापासूनच आमच्यासाठी हा विषय जवळचा आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lets be aware of environmental conservation deputy cm ajit pawar decision gst

ताज्या बातम्या