रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा अंदाज कायम

पुणे : मुंबईसह कोकण विभागात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला तरी बहुतांश भागांना रविवारी (१३ जून) पावसाने हुलकावणी दिली. केवळ काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. मुंबई, ठाण्यातील अतिवृष्टीचा इशारा मागे घेण्यात आला असला, तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

मोसमी पावसाचे मुंबई आणि परिसरात आगमन झाल्याच्या दिवशी ९ जूनला मुंबई आणि ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली होती. या पावसाने शहरात दाणादाण उडवली. या काळात अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे येत होते. उत्तर किनारपट्टी ते केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत होते. त्यामुळे कोकण विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. कोकणात काही ठिकाणी आणि मुंबई परिसरासह ठाणे विभागात १३ जूनसाठीही काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाटक्षेत्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात १३ जूनला या भागात पाऊस गायब होता. मुंबई, रत्नागिरी, अलिबाग या भागांत किरकोळ पावसाची नोंद झाली.

सद्य:स्थितीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वायव्य बंगालचा उपसागर ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे अद्यापही कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही भागांत १४ जूनला अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांतील घाटक्षेत्रांत १४ आणि १५ जूनला मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

विदर्भातही हुलकावणी

नागपूर : विदर्भातील अकरापैकी नऊ जिल्ह्य़ांत रविवारी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र नागपूरसह इतर जिल्ह्य़ांत हलक्या सरींचा अपवाद वगळता पाऊस झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली होती. रविवारी वाशीम, बुलढाणा आणि अकोला वगळता नागपूरसह इतर जिल्ह्य़ांतही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मात्र गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ातील काही भागांचा अपवाद वगळता इतरत्र विशेष पावसाची नोंद नाही.

मुंबई दिवसभर पावसाची उघडीप

मुंबई : ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची अपेक्षा असतानाही रविवारचा पूर्ण दिवस मुंबईकरांसाठी कोरडाच ठरला. शनिवारी कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे पाऊस वाढण्याची शक्यता होती; मात्र आता हे क्षेत्र दक्षिणेकडे सरकले असून त्यामुळे रविवारी मुंबईत पाऊस झालाच नाही, असे हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे प्रमुख जयंत सरकार यांनी सांगितले. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे २४ मिलिमीटर आणि सांताक्रूझ येथे ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोसमी पाऊस काश्मीपर्यंत..

’नैर्ऋत्य मोसमी पावसाचा देशातील वेगवान प्रवास सुरूच असून, रविवारी तो उत्तर-पूर्व दिशेने वेगाने पुढे येत थेट काश्मीपर्यंत दाखल झाला आहे.

’त्यामुळे आता मोसमी पावसाने देशातील ८० टक्क्यांहून अधिक भाग व्यापला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातच त्याची प्रगती शिल्लक राहिली आहे.

’पुढील ४८ तासांमध्ये मोसमी पाऊस दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी भागांत प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.