चिमूरच्या अपक्ष महिला उमेदवाराचे अफलातून आश्वासन

आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटवून बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने देणार, गाव तिथे बिअर बार योजना राबवणार, बारमध्ये व्हिस्की, बिअर सवलतीत देणार अशी अफलातून आश्वासने चिमूरमधील अपक्ष उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी दिली असून त्या आपल्या प्रचारात दारूबंदी हटावची मागणी जोरकसपणे क रत आहेत.

जिल्हय़ात एप्रिल २०१५ पासून दारूबंदी असून त्यासाठी आदोलन करणाऱ्या श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी ब्रम्हपुरीत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दारूबंदी लागू करणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून निवडणूक रिंगणात आहेत. या पाश्र्वभूमीवर वनिता राऊत यांच्या आश्वासनाने लक्ष वेधून घेतले आहे. दारूबंदी समर्थनार्थ अजब युक्तिवाद करताना राऊत म्हणतात की, नागरिकांना दारू पिण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला पाहिजे. काही भागात मद्यप्राशन सामाजिक प्रथा असून लोकांना चोरून दारू पिण्यास व विकण्यास भाग पाडण्याशिवाय दारूबंदीने  काहीही साध्य झालेले नाही. जनता चोरून, दुप्पट-तिप्पट भावाने दारू पिते तेव्हा फार दु:ख होते. कुटुंबातील सर्वानी मिळून दारू पिल्यास घरात वाद, भांडणे होणार नाहीत.

दारू तस्कराचे फलकावर छायाचित्र; काँग्रेस अडचणीत

संपूर्ण दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्हय़ात आतापर्यंत तीन वेळा दारू तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले व श्रमिक एल्गारने तडीपारीची मागणी लावून धरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांचे छायाचित्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश मेंढे यांच्या फलकांवर झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पंक्तीत एका दारू तस्कराला स्थान दिल्याने महिलांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.