राज्यात मतमोजणीसाठी दीड लाख अधिकारी- कर्मचारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी राज्यातील ४८ मतदारसंघात यंत्रणा सज्ज झाली असून तब्बल एक लाख अधिकारी- कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार असून ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी ५० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची मोजणी आता मतमोजणी संपल्यानंतर करण्यात येणार असल्याने सकाळीच राज्यातील चित्र स्पष्ट होईल. राज्यातील सर्वच जागांचे निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र होईल, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली. गडचिरोली मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच पाच उमेदवार असल्याने तेथील निकाल  लवकर लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतमोजणीसाठी ४८ ठिकाणी मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रात विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणी होणार असून किमान १४ टेबल्स मांडण्यात येणार असून काही ठिकाणी अधिक टेबल्स मांडण्यात आले आहेत. पालघर आणि भिवंडी-गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण ३३ निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरूर मतदारसंघात एकूण ३२ फेऱ्या होतील. सर्वात कमी म्हणजे १७ मतमोजणी फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात १८ फेऱ्या होतील.

ज्या ठिकाणी उमेदवार अधिक आहेत, अशा कल्याण आणि बीड लोकसभा मतदारसंघातील निकाल लांबण्याची शक्यता असून गडचिरोली मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच पाच उमेदवार असल्याने तेथील निकाल लवकर लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी आयोगाने विविध सुविधा करून दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. त्याचप्रमाणे व्होटर हेल्पलाईन या मोबाईल अ‍ॅपवरही निकाल पाहता येईल. शिवाय १९५० या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या  नियंत्रण कक्षातील  ०२२-२२०४०४५१ /५४  या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य गेट, गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डिगवर निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.