शेतक-यांना उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा भ्रष्ट चेहरा उघड करण्यासाठी, तसेच दुष्काळी परिस्थिती मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलने करावीत. पक्षाच्या आमदारांनीही सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध विधानसभेचे कामकाज बंद पाडावे, असे आवाहन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सीताराम गायकर, महापौरपदी अभिषेक कळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पिचड यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जि.प. अध्यक्ष मंजूषा गुंड आदी उपस्थित होते. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पीक कर्ज व वीजबिल माफ करावे, जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात, टँकर सुरू करण्याचे अधिकारी पुन्हा तहसीलदारांकडे द्यावेत आदी मागण्यांचे ठराव या वेळी करण्यात आले.
भाजप सरकार शेतक-यांचे नाहीतर अंबानी व त्यांच्या बगलबच्च्यांचे, व्यापा-यांचे व दलालांचे आहे, असा आरोप पिचड यांनी केला.
घुले म्हणाले, कार्यकर्त्यांनी आता आपण सत्तेत नाही विरोधक आहोत, हे समजून सरकारला आक्रमकपणे विरोध करण्यासाठी आपल्या तलवारी म्यानातून बाहेर काढाव्यात. परिस्थिती प्रतिकूल असली तरी सक्षम विरोधक कसा असतो, हे दाखवून द्यावे. माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर व घनश्याम शेलार यांचीही भाषणे झाली. माजी आमदार भानुदास मुरकुटे, अरुण कडू, विठ्ठलराव लंघे, कैलास वाकचौरे, सुजित झावरे, कपिल पवार, संजय गव्हाणे, नंदा वारे, निर्मला मालपाणी, डॉ. मेधा कांबळे आदी उपस्थित होते.
‘निष्ठावानांची फौज उभी करा’
माजी मंत्री पिचड यांनी नूतन जिल्हाध्यक्ष घुले यांना पक्षातील गटबाजी थांबवण्याचे आव्हान स्वीकारावे असे आवाहन केले. पक्षातील चार कार्यकर्ते कमी झाले तरी चालतील, परंतु निष्ठावानांची फौज तयार करा, असे ते घुले यांना उद्देशून म्हणाले. गडाख गटाचे कार्यकर्ते मात्र बैठकीला अनुपस्थित होते.
‘भाजप-सेनेशी हातमिळवणी बंद’
घुले यांनी यापुढे स्थानिक पातळीवर भाजप-सेनेबरोबर हातमिळवणी बंद, ग्रामपंचायत व बाजार समित्यांच्या निवडणुकीतही या दोघांचे सहकार्य न घेता स्वबळावर निवडणुका लढवण्याचे, स्थानिक पातळीवर यापुढे समन्वयाचे राजकारण बंद, असे जाहीर केले. बुधवारपासून (दि. १५) आपण प्रत्येक तालुक्यात दौरा करणार. त्यानंतर दुष्काळाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.