रायगड जिल्हा परिषद ५९ आणि पंचायत समित्याच्या ११८ जांगासाठी मतदानाच्या प्रक्रीया मंगळवारी पुर्ण झाली. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून या सर्व जागांसाठी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रस्थापित पक्ष आपापले गड राखणार का़ याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे वर्चस्व आहे. तर १५ पंचायत समित्यांपकी सहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस, पाच पंचायत समित्यावर शेकाप तर चार पंचायत समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या पाश्र्वभुमीवर झालेल्या मतदानाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणाऱ हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्य़ात स्थानिक पातळ्यावर सोयीस्कर आघाडय़ांचा पॅटर्न सर्वच राजकीय पक्षांनी राबविला आहे. राष्ट्रवादीने शेकापशी आघाडी केली आहे. काही ठिकाणी या आघाडीत काँग्रेसही सहभागी झाली आहे. तर अलिबाग, पेण, कर्जत या तालुक्यात शिवसेनेने काँग्रेसशी जुळवून घेतले आहे. राज्यात भाजपसोबत यापुढे जायचे नाही. असे सेनेने स्पष्ट केले असले. तरी जिल्ह्य़ात मात्र परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर मोठय़ा प्रमाणात उमेदवार दिले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र लवचिक भुमिका घेण्याचे धोरण पक्ष नेत्यांनी स्विकारले आहे. युती, आघाडय़ांच्या या सोयीस्कर पॅटर्नची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली आहे. राजकीय पक्षांच्या अंतर्गत गुंतागुतीमुळे मतदारमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिला. हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्ह्य़ात लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल शिवसेना भाजपच्या बाजूने दिला होता. नगर पालिका निवडणूकीत स्वबळावर लढूनही शिवसेनेला दोन ठिकाणी तर भाजपला एक ठिकाणी सत्ता मिळवण्यात यश आले होते. राष्ट्रवादी आणि शेकापची या निवडणूकीत मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले होते. उत्तर रायगडात शेकाप तर दक्षिण रायगडात राष्ट्रवादी हे मोठे पक्ष आहेत. त्यामुळे या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल असा विश्वास त्यांना आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राखण्यासाठी दोन्ही पक्षांना ३० सदस्य निवडून आणावे लागणार आहे. जिल्ह्य़ात शिवेसेना आणि भाजपची घौडदौड रोखण्यात हे दोन्ही पक्ष यशस्वी होतील का याचे उत्तर आज मिळणार आहे.

थळ, कुर्डुस आणि वरसे मतदारसंघातील निकाल महत्वाचे

अलिबाग तालुक्यातील कुर्डूस थळ आणि रोहा तालुक्यातील वरसे मतदारसंघातील निकाल महत्वाचे ठरणार आहेत. या तिन्ही मतदारसंघातून तीन अध्यक्षपदाच्या संभाव्य दावेदार महिला निवडणूक लढवत आहेत. थळमधून शिवसेनेच्या मानसी दळवी, कुर्डूस मधून शेकापच्या चित्रा पाटील आणि वरसेमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे निवडणूक िरगणात आहेत. तिघींच्या निकालावर रायगडकरांचे लक्ष्य लागून राहिले आहे.