पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर भाजपाविरोधात हल्लाबोल केला आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहेत. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेनं भाजपावर टीकेचा बाण डागले. संजय राऊत होत असलेल्या टीकेला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी चिमटे काढतं उत्तर दिलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता निशाणा साधला आहे. “प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!,” असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना नाव न घेता लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- “…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; संजय राऊतांना टोला

आणखी वाचा- “मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेनं दिला?”

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यावरून सध्या शिवसेना-भाजपा यांच्यात आरोप आणि टीकेच्या फैरी झडत आहेत. वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी मोदी सरकारसह महाराष्ट्र भाजपावर टीका केली होती. भाजपाकडून राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.