राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गृहरक्षक दलात बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केल्यानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर कोंडीत सापडल्याचं चित्र असून, दुसरीकडे भाजपाही आक्रमक झाली आहे. या राजकीय परिस्थिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राऊत यांनी जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला असून, त्याचे वेगवेगळे अर्थ आता लावले जाऊ लागले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी पत्र पाठवलं. या पत्राने खळबळ उडाली. सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून, आता सरकारचं पुढचं पाऊल काय असेल? अशी चर्चा सुरू आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने अनेकांना बुचकळ्यात टाकलं आहे. संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला आहे. “हमको तो बस तलाश नए रास्तो की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है” असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटमधून राऊत यांना नेमकं काय म्हणायचं? या ट्विटमधून राऊत काय संकेत देत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांनाही पूर्वकल्पना!

मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा गुंता वाढत असतानाच व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यासह मुंबई पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. या भेटीत आपण गृहमंत्र्यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. देशमुख यांच्या आर्थिक मागण्या, पोलीस कारभारातील वाढता हस्तक्षेप याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली होती. बहुतेक बैठकांना काही मंत्री उपस्थित होते. त्यांना देशमुख यांच्या वर्तनाची पूर्व कल्पना होती, असा दावाही सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला.