एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटणाऱ्या सोलापुरात प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्या रूपाने भरीव स्वरूपात विकासाच्या पाऊलखुणा दिसत नाहीत. स्मार्ट सिटीचा फोलपणा उघड झाला असताना दुसरीकडे उपलब्ध पायाभूत सेवा-सुविधा अस्तित्वहीन होत आहेत. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालयही गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता रद्द केल्यानंतर हे प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने निधीची तरतूद होऊन आवश्यक सुधारणा होण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे.  विजापूर रस्त्यावर रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुंदरम यांच्या पुढाकाराने १९७७ साली महात्मा गांधी प्राणी संग्रहालय उभारण्यात आले होते. सुमारे २३ एकरावरील या प्राणी संग्रहालयाचे अस्तित्व नेहमीच धोक्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या प्राणी संग्रहालयातील सलीम-अनारकली नावाची सिंह नर मादीची जोडीने पर्यटकांना भुरळ पाडली होती. मध्यंतरी २००७-८ साली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त एम. एस. देवणीकर यांनी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने उपस्थित केलेल्या त्रुटींची बऱ्यापैकी पूर्तता करून सुधारणा केल्या होत्या. देवणीकर यांच्या पश्चात या प्राणी संग्रहालयाची पुन्हा उपेक्षा झाली. त्यातच एकाच वेळी ३० हरिणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे या प्राणी संग्रहालयाची प्रतिमा मलिन झाली होती. आज अखेर १३९ वेगवेगळय़ा प्रकारचे प्राणी-पक्षी या प्राणी संग्रहालयात होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक पर्यटक या प्राणी संग्रहालयास भेट देत होते. सोलापूरच्या आसपास पुण्याचा अपवाद वगळता सुमारे अडीचशे किलोमीटर अंतराच्या परिसरात एकही प्राणी संग्रहालय उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे या प्राणी संग्रहालयाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात आले असताना केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या पथकाने सर्वप्रथम १६ ऑक्टोबर २०१७ रोजी संग्रहालयास भेट देऊन परीक्षण केले होते. या भेटीनंतर प्राधिकरणाने एकूण ४५ त्रुटी निदर्शनास आणून देत त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाला २२ त्रुटींची पूर्तता करणे शक्य झाले होते. उर्वरित त्रुटींची पूर्तता ठरलेल्या कालावधीत झाली नसल्यामुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने शेवटी २८ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. या आदेशाविरुद्ध सोलापूर महापालिकेने १५ जानेवारी २०२२ रोजी अपिलीय प्राधिकरणाकडे अपील दाखल केले होते. त्यावर अपिलीय प्राधिकरणाने सुनावणी करून पुढील तीन महिन्यांच्या मुदतीत प्राणी संग्रहालयातील सुविधांविषयक त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.  दरम्यानच्या काळात सोलापूर महापालिकेने प्राणी संग्रहालयासाठी २०२२-२३ आर्थिक वर्षांत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दोन कोटी १८ लाख रूपये निधीची अर्थसंकल्पीय तरतूद केली. पशुवैद्यकीय अधिकारी, किचन स्टोअर, संरक्षक भिंती व अन्य सुविधा निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. संबंधित मक्तेदाराला कार्यारंभ आदेशही देण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्राणी संग्रहालयात असलेल्या प्राण्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे अतिरिक्त असे ७७ प्राणी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. यात नऊ मगरींसह दोन सांबर ५१ चितळ, १५ काळविटांचा समावेश होता. एकीकडे या प्राणी संग्रहालयात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले हे प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू होण्याची शाश्वती कोण देणार, हा प्रश्न उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर गेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात भाजपचे नेते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर शासनाकडून आवश्यक सुधारणा होत असल्याबाबत माहिती देण्यात आली खरी; परंतु आगामी काळात हे प्राणी संग्रहालयास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून रद्द झालेली मान्यता पुन्हा कधी मिळणार ? त्यासाठी आणखी किती दिवसांचा कालावधी लागणार ? हा प्रश्न आहे.