सांगली : भगवान महावीर यांची जयंती आज सांगली व मिरज शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर यांच्या पंचधातूच्या मुर्तीची पालखीतून सवाद्य मिरवणुकही काढण्यात आली. मंदिरामध्ये पूजाअर्चा, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी मिरजेतील पाटील हौद येथे असलेल्या शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या पंचधातूच्या मुर्तीची भव्य मिरवणुक काढण्यात आली.
हेही वाचा : “मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोंडून ठेवलं”, रश्मी ठाकरेंबाबत सदा सरवणकरांचं मोठं विधान!
मिरवणुकीत सजवलेले घोडे, हत्ती यांचा सहभाग होता. पालखी तांदूळ मार्केट परिसरात आल्यानंतर पद्मावती शांती सेवा फौंडेशनच्यावतीने ताक वाटप करण्यात आले. पालखी मिरवणुकीमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनीही सहभाग नोंदवला. मिरवणुकीमध्ये विवेक शेटे, माजी स्थायी सभापती निरंजन आवटी, रोहित चिवटे, सुकुमार पाटील आदींसह जैन समाजाचे शेकडो तरूण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर जैन मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी पद्मावती लॉन बकुळ बाग याठिकाणी महाप्रसाद आयेाजित करण्यात आला होता.