नंदूरबारच्या म्हसावदा-आमोद रस्त्यावर गुरूवारी पहाटे रिक्षा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

आज पहाटे मालेगावकडून सटाण्याकडे अॅपे रिक्षा जात होती. या अॅपे रिक्षामध्ये सातजण होते. यात काही व्यावसायिकही आणि स्थानिक कलाकार होते. यावेळी एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतरणाऱ्या चार स्थानिक कलाकारांचा समावेश आहे.

तत्पूर्वी आज सकाळी सटाणा- मालेगाव रस्त्यावर आणखी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिली होती. त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. त्यांचे मृतदेह सटाणाच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र अपघात स्थळी सापडलेली खेळणी व अन्य साहित्यावरुन सर्वजण व्यावसायिक असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.