एकतर्फी प्रेमातून १८ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून करणाऱ्या स्वप्नील शिवाजी वाघमारे (२२) या तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. पी. कुरेकर यांनी आरोपीला एक हजार रुपये दंडही ठोठावला.
शहरातल्या विवेकनगर परिसरात निवृत्त पोलीस उपअधीक्षक गुंजकर यांचा वाडा आहे. याच वाडय़ात वसमत येथील मयूरी गोविंद बाऱ्हाळे (वय १८) विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शहरातल्या सुमेधनगर भागातील स्वप्नील वाघमारेचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. स्वप्नीलने अनेक वेळा तिला प्रेमासाठी साकडे घातले. पण तिने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरून २४ जानेवारी २०११ रोजी स्वप्नीलने मयूरीच्या खोलीत जाऊन तिच्यावर १३ वार केले. तिच्या ओरडण्याने आजूबाजूचे नागरिक जमले. तोपर्यंत स्वप्नील पसार झाला. मयूरीला नांदेडच्या गुरू गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिचा काही क्षणातच मृत्यू झाला.
मयूरीचे वडील गोिवद बाऱ्हाळे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी स्वप्नीलविरुद्ध गुन्हा नोंदविला. घटनेनंतर पसार स्वप्नीलला मुंबई पोलिसांनी एका वाहनचोरीच्या गुन्हय़ात अटक करून नांदेड पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने या प्रकरणात १२जणांच्या साक्षी नोंदवल्या. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्या. ए. पी. कुरेकर यांनी स्वप्नीलला वरील शिक्षा सुनावली.     

कुलगुरूंकडून मोरे यांच्या चौर्यकर्माची पाठराखण!
नांदेड-‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक व्ही. एम. मोरे यांचे चौर्यकर्म फार गंभीर बाब नाही, अशा शब्दांत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी आपल्या या सहकाऱ्याची पाठराखण केली आहे.प्रा. मोरे यांनी शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील लेख जसाच्या तसा उचलून ‘युनिव्हर्सिटी न्यूज’ या साप्ताहिकात आपल्या नावावर छापून आणल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’नेही प्रसिद्ध केले होते. मोरे यांनी कोणाचा पीएच.डी. प्रबंध चोरलेला नाही. सर्व विद्यापीठांची कार्यप्रणाली सारखी असू शकते, असे स्पष्ट करून हे प्रकरण गंभीर नाही, या मुद्यावर कुलुगुरूंनी जोर दिला. या चुकीबद्दल मोरे यांनी शिवाजी विद्यापीठाकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे निमसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.