सोलापूर : हैदराबादला मित्राच्या घरी लग्नकार्यासाठी जाऊन रेल्वेने सोलापुरात येऊन घराकडे पायी चालत निघालेल्या एका प्रवासी पादचाऱ्याचा सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारून खून केला. पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

संतोष बाबुराव गुमटे (वय ४५, रा. राजेश कोठे नगर, दमाणीनगरजवळ, सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ विजयकुमार गुमटे याने सदर बझार पोलीस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत संतोष हा इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुरूस्ती कामात तंत्रज्ञ होता. तो नव्या पेठेतील एका खासगी दुकानात काम करीत होता.

हेही वाचा…शशिकांत शिंदेंना अटक होणार असल्याच्या चर्चेने गरमा-गरमी

तो हैदराबादमध्ये एका मित्राच्या लग्नकार्यासाठी गेला होता. तेथून रेल्वेने पहाटे सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरून पायी चालत घराकडे जात होता. रेल्वे स्थानकाच्या पाठीमागील बाजूस सिमेंट गोदामजवळ त्याच्यावर कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा उलगडा लगेचच झाला नाही.