भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. पण त्यांच्याबरोबर भाजपाचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले, “खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील. तसेच करोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळे १० ते १२ आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.”

आणखी वाचा- ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना…; मुनगंटीवारांची खडसेंना भावनात्मक साद

“भाजपाची खऱ्या अर्थानं वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचं मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.