प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी भाषा विभागातर्फे कविवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चांदीबाई हिम्मतलाल मन्सुखानी महाविद्यालय, उल्हासनगरचे मराठी विभागाप्रमुख प्रा. नितीन आरेकर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. संजीवनी नाईक, मराठी विभागप्रमुख प्रा. नम्रता पाटील, डॉ. ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील साहित्याच्या कात्रणांनी साकारलेल्या भित्तिपत्रकाच्या कोलाजचे उद्घाटन प्रा. नितीन आरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नम्रता पाटील यांनी केले. यानंतर प्रा. नितीन आरेकर यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने सुसंवाद साधला. आपण आपल्या भागातील बोली जपल्या पाहिजेत, कारण या बोली मराठी भाषेच्याच उपभाषा आहेत, त्याचबरोबर मराठी पुस्तके जास्तीत जास्त आस्वादणे आवश्यक आहे, असे आपले मत अनेक अनुभवांतून व्यक्त केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. संजीवनी नाईक यांनी ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देत आपल्या जीवनानुभवात मराठी भाषेतील स्थान यावर आपले अध्यक्षीय भाष्य व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रांत वार्डे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. ओमकार पोटे यांनी मानले.