नांदेडच्या प्रचाराच्या सभेत खासदार चव्हाण यांचे टीकास्त्र

देशात कमळ, राज्यात कमळ आणि नांदेडमध्ये कमळ ही घोषणा भाजपाने दिली आहे, परंतु देशात अंधार, राज्यात अंधार आणि आता नांदेडमध्येही अंधार करण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. त्यांचा हा मनसुबा उधळून लावण्यासाठी भाजपाला उखडून टाकण्याची सुरुवात नांदेडमधून करा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केले.

काँग्रेस-पीआरपी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ चौफाळा येथील निरंजन आश्रम शिवमंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार शरद रणपिसे, आमदार डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार विजय खडसे, माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सरचिटणीस बी. आर. कदम, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी आदींसह असंख्य कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना खासदार चव्हाण म्हणाले, की जुन्या नांदेडातील चौफाळा विभागाचे काँग्रेससाठी वेगळे महत्त्व आहे. या विभागातून १९५२ साली सर्वप्रथम या देशाचे नेते स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीचा शुभारंभ ते नेहमीच चौफाळ्यातून करत असत. त्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत काँग्रेसने चौफाळ्यामधून प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला.  कांही वर्षांपूर्वी हिंदी – चिनी भाई भाई असा नारा दिला होता. तसाच नारा आता भाजप-एमआयएम भाई भाई असा दिला जात आहे.

नारायण राणेंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा: अशोक चव्हाण

भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी एमआयएम मुस्लीम मतांच्या विभागणीसाठी काम करीत आहे. शिवसेना महागाईच्या नावावर ओरडत आहे. त्याऐवजी हा पक्ष सत्तेच्या बाहेर का पडत नाही, असा सवाल करतांनाच शिवसेना म्हणजेच लेना ना देना उपरसे शिवसेना, अशी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीचे घडय़ाळ १० वाजून १० मिनिटाला बंद पडले आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. भाजपाचा कारभार शिवसेनेतील एक आमदार हाकत आहे. त्यामुळे या सावळ्या गोंधळाला चोख उत्तर देण्यासाठी महापालिकेतील सत्ता काँग्रेसकडे सोपवा, असे या वेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

या वेळी माणिकराव ठाकरे यांचेही भाषण झाले. या वेळी बसपातून नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले दिगंबर मोरे यांनी आपल्या भाषणातून भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी-एमआयएम या पक्षांवर प्रहार केला. शफी अहंमद कुरेशी यांनी नांदेडच्या हितासाठी व अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देण्यासाठी अशोकरावांचे हात मजबूत करा अशी विनंती केली. तत्पूर्वी महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची मतदारांपुढे ओळख करून देण्यात आली.