मोबाईलवरून दोन मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने आपल्या झोपलेल्या मित्राचा दगडाने डोके ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मारेकरी स्वतःहून पोलिसांत हजर झाला. हा धक्कादायक प्रकार सांगोला येथे कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला.

आण्णा मोहन साखरे (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा सहकारी मित्र असलेला किरण कोळी याने स्वतःहून सांगोला पोलीस ठाण्यात हजर होऊन मित्राचा खून केल्याची कबुलीसह माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आण्णा साखरे व आरोपी किरण कोळी हे दोघे मित्र सांगोला कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज मोलमजुरी करायचे. काल मंगळवारी रात्री या दोघांनी मद्यप्राशन केले. त्यावेळी मृत आण्णा साखरे याने किरणचा मोबाईल घेतला. तो परत मागितला असता त्याने पाचशे रूपयांची मागणी केली. रक्कम दे, नाहीतर काय करायचे ते कर असे त्याने सुनावले. त्यावरून झालेला वाद नंतर मिटला आणि दोघेही बाजार समितीच्या आवारात झोपी गेले. मात्र पहाटे आण्णा साखरे हा झोपेत असताना रात्रीच्या वादाचा राग मनात बाळगून किरण याने दगडाने त्याचे डोके ठेचले. यात तो जागीच गतप्राण झाला.

या घटनेनंतर किरण हा स्वतःहून सांगोला पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे आण्णा साखरे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्याला रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.