दिगंबर शिंदे, सांगली

संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त  दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत महोत्सवाची परंपरा यंदा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत पोलिसांनी खंडित केली आहे! यामुळे रसभंगाची कटय़ारच काळजात घुसल्याची भावना संगीतरसिकांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या साडेसहा शतकांपासून मिरजेमध्ये मीरासाहेब उरूस भरतो. स्वत: खाँसाहेब या दग्र्यामधील ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली मीरासाहेबांच्या चरणी संगीत सेवा अर्पण करीत होते. तीच परंपरा त्यांच्या शिष्यांनी या महोत्सवाच्या रूपाने कायम राखली आहे. खाँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील कलावंत सलग तीन रात्री या दर्गा आवारात संगीत सेवा रुजू करतात.

यंदा २ ते ५ एप्रिल या दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे हे ८५ वे वर्ष आहे. मात्र या महोत्सवाला लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मिरजेतील सांस्कृतिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. यंदाच्या महोत्सवातही देशाच्या विविध भागांतील कलाकार हजेरी लावण्यासाठी येणार आहेत. यासाठी स्थानिक समितीकडून पुणे, बेंगळुरु, मुंबई, ठाणे, इंदूर, राजकोट, कोलकता, दिल्ली येथील ४० हून अधिक कलाकारांना पाचारण करण्यात आले आहे. महोत्सवाची सर्व सज्जता झाली असून स्थानिक आयोजक शहर पोलीस ठाण्यात या संगीत महोत्सवासाठी परवानगी मागण्यासाठी गेले असता निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत परवानगी नाकारली गेल्याचा धक्कादायक अनुभव त्यांना आला.

मिरजेत आयोजित करण्यात येत असलेली खाँसाहेब स्मृती संगीत सभा हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून या कार्यक्रमापासून राजकीय व्यक्तींना कटाक्षाने बाजूला ठेवण्यात येते, हे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे. यामुळे या संगीत सभेला परवानगी मिळावी, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, याच कालावधीत साडेसहा शतकांची परंपरा असलेला मीरासाहेब उरूस साजरा होत आहे. हा उरूसही आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडण्याची चिन्हे असून या उरसालाही प्रशासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.