सोलापूर : मराठी चित्रपटसृष्टीचे नाव जगभर नेणारे नागराज मंजुळे यांची चित्रपटांविषयीची अभिरूची लहानपणी जेथे घडली आणि वाढली, त्याचे साक्षीदार राहिलेले करमाळा शहरातील दोन चित्रपटगृहे गेल्या पाच वर्षांपासून बंदच आहेत. त्यामुळे मंजुळेंच्या गावची चित्रपटांशी ' नाळ 'तुटली असताना सुदैवाने याच करमाळ्यात नव्याने उभारलेल्या छोटू महाराज चित्रपटगृहामुळे तुटलेली नाळ पुन्हा जुळली आणि तेथेच प्रदर्शित झालेला मंजुळेंचा 'बापल्योक' हा नवा चित्रपट पाहण्याची संधी गावाला मिळाली आहे. त्याचा आनंद समस्त करमाळेकरांसह नागराज मंजुळे यांनाही झाला आहे. अतिशय सशक्त कलाकृतीतून स्वतःचा वेगळा ठसा उमटविणा-या दिग्दर्शकांमध्ये गणणा होणा-या नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांनी वडील आणि मुलाच्या अनवट नात्यावर आधारलेला 'बापल्योक ' हा नवा मराठी चित्रपट तेवढ्याच सशक्तपणे तयार केला आहे. हा चित्रपट करमाळा येथे नव्याने उभारलेल्या छोटू चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यावेळी स्वतः नागराज मंजुळे यांच्यासह करमाळा आणि जेऊर भागातील त्यांचे बालपणीचे अनेक सवंगडी हजर होते. हेही वाचा >>> आई-बाबांनी नव्हे तर ‘या’ व्यक्तीने ठेवलंय गश्मीरचं नाव, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा माणसाच्या रोजच्या जगण्यातील प्रतिबिंब, समाजातील वास्तव, मानवी भावभावना आपल्या चित्रपटकलाकृतीतून दाखविणारे नागराज मंजुळे यांचे यापूर्वी 'फॕन्ड्री', 'सैराट' हे चित्रपट गाजले. 'पिस्तुल्या' , 'पावसाचा आनंद' या लघुपट निर्मितीमुळे नागराज मंजुळे यांचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या किंवा शास्त्रीय धडे न घेतलेल्या मंजुळे यांच्यातील 'प्रेक्षक' आणि चित्रपटविषयक अभिरूची करमाळ्यासारख्या लहानशा शहरातील चित्रपटगृहांनीच घडविली होती. त्यातूनच मनाला भिडणारे सामाजिक वास्तव रूपेरी पडद्यावरही दिसले पाहिजे, या भावनेतून त्यांच्यातील सर्जनशील दिग्दर्शकाचा जन्म झाला. परंतु याच करमाळ्यातील 'सागर' आणि 'योगेश' या दोन्ही चित्रपटगृहे मागील पाच वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे मंजुळे यांचा 'नाळ' हा चित्रपट करमाळेकरांना स्वतःच्या गावी चित्रपटगृहात जाऊन पाहता आला नव्हता. नंतर बिग बी अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन मंजुळे यांनी तयार केलेला 'झुंड' हा चित्रपटही गावातील चित्रपटगृहात पाहता न आल्याची रूखरूख तेथील रसिकांना होती. हेही वाचा >>> भूषण प्रधान की वैभव तत्त्ववादी? पूजा सावंत नक्की कोणाला करतेय डेट? अखेर अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली… नागराज मंजुळे हे करमाळा तालुक्यातील जेऊर येथील राहणारे. लहानपणापासून त्यांना चित्रपटांची आवड होती. करमाळ्यातील 'सागर' आणि 'योगेश'मध्ये त्यांनी अनेक चित्रपट पाहात स्वतःच्या कलाजाणिवा जोपासल्या. त्यामुळे या दोन्ही चित्रपटगृहांशी मंजुळे यांच्याबरोबरच समस्त करमाळावासियांच्या भावना जोडल्या होत्या. विशेषतः मंजुळे यांचे फॕन्ड्री आणि सैराट हे दोन्ही गाजलेले चित्रपट सागर चित्रपटगृहात पाहताना, 'आपल्या गाववाल्याचा सिनेमा' म्हणून तेथील रसिकांनी नागराज मंजुळे यांच्याविषयी अभिमान बाळगला. परंतु काळाच्या ओघात दोन्ही चित्रपटगृहे बंद पडली. त्यातून मंजुळे यांची स्वतःच्या गावातील चित्रपटगृहांशी असलेली नाळही तुटली होती. या पार्श्वभूमीवर उशिरा का होईना, याच करमाळ्यात छोटू महाराज नावाचे नवीन चित्रपटगृह उभारले गेले असून येथेच मंजुळे यांचा 'बापल्योक' नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याबद्दल करमाळ्यातील रसिकांनी आनंदित होऊन 'बापल्योक' पाहण्यासाठी गर्दी केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताना स्वतः नागराज मंजुळे व त्यांचे सहकारी 'छोटू महाराज'मध्ये दाखल झाले. चित्रपट संपल्यानंतर मंजुळे यांनी रसिकांनी खुला संवादही साधला. लहानपणी क्रिकेट, आट्यापाट्या, गोट्या, पतंग यासारखे खेळ ज्यांच्या सोबत खेळले त्या सवंगड्यांनाही बापल्योक पाहून मंजुळे यांच्याशी गप्पागोष्टी करताना अतिशय आनंद झाला. अनेकांनी बालबच्च्यांसह मंजुळेंसोबत सेल्फी काढण्यात मग्न होते.