आखाडय़ांची नोंदणी व साधूंची ओळख यावरून जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे साधू-महंतांनी आगपाखड करत थेट त्यांना हटविण्याची मागणी केली असताना अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेने आगामी सिंहस्थात जे ‘संधीसाधू’ असतील त्यांचा बंदोबस्त करण्याबरोबर अनुचित प्रकार टाळण्यासाठी संप्रदाय, आखाडे यांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
नोंदणीबाबतची माहिती संकलन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने त्वरेने राबवावी, अशी मागणीही परिषदेने केली आहे. या प्रकाराने आता साधू-महंतांमधील अंतर्गत वाद-विवादाच्या नाटय़ाचा पडदा उघडला गेला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद यांचा प्रदीर्घ काळचा इतिहास आहे. जिल्हा प्रशासन, राजकीय पदाधिकारी व साधू-महंत यांच्यात कधी कोणत्या कारणावरून विवाद निर्माण होईल याचा नेम नसतो. २०१५-१६ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची लगबग सुरू असताना असाच एक प्रवाद सध्या निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खरा साधू कोण, त्याची ओळख कशी पटवावी, असा प्रश्न उपस्थित करत आखाडय़ांना नोंदणी करण्याबाबत सूचित केले होते. त्यांचे हे वक्तव्य साधू-महंतांना चांगलेच झोंबले.
अनेकांनी साधूंची ओळख पटविणारे जिल्हाधिकारी कोण, असा सवाल करत त्यांना हटविण्याची मागणी केली. काही साधू-महंतांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व नाशिकच्या पालकमंत्र्यांसमोरही हा मुद्दा मांडला. सिंहस्थ कामात रस नसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी आखाडय़ांची कायदेशीर नोंदणी नियमावलीसह बंधनकारक करण्याची आधीच मागणी करणाऱ्या अखिल भारतीय वैष्णव परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. याबाबतचे निवेदन परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले
आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक ‘संधीसाधू’ सहभागी होतात, असा परिषदेचा आक्षेप आहे. ही मंडळी चुकीची माहिती शासनापर्यंत पोहोचवितात. कुंभमेळ्यात काही गंभीर प्रकार घडल्यास खरे साधू-महंत विनाकारण बदनाम होतात, असे परिषदेचे म्हणणे आहे.
वैष्णव बैरागी परिषद ही नोंदणीकृत संस्था असून आमचे रामानंदी, निम्बार्क, माधव, विष्णू स्वामी तसेच दिगंबर, खाकी, निर्वाणी व निर्मोही असे आखाडे असल्याचे परिषदेने म्हटले आहे. खालशांची संख्या अधिक आहे.
 सिंहस्थ कुंभमेळ्यात सामील झालेले काही जण फसवेगिरी करतात, अशी तक्रार परिषदेने केली आहे. आखाडय़ांची नोंदणी व साधूंची ओळख यामुळे आधीच साधू-महंत व जिल्हाधिकारी यांच्यात एका नव्या प्रवादाला तोंड फुटले असताना अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेने कायदेशीर नोंदणीच्या मुद्दय़ाचा आग्रह धरला आहे. परिषदेच्या या भूमिकेमुळे आता साधू-महंतांमध्ये एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी खरा साधू कोण, त्याची ओळख कशी पटवावी, असा प्रश्न उपस्थित करत आखाडय़ांना नोंदणी करण्याबाबत सूचित केले होते. त्यांचे हे वक्तव्य साधू-महंतांना चांगलेच झोंबले. अनेकांनी साधूंची ओळख पटविणारे जिल्हाधिकारी कोण, असा सवाल करत त्यांना हटविण्याची मागणी केली. काही साधू-महंतांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व नाशिकच्या पालकमंत्र्यांसमोरही हा मुद्दा मांडला. सिंहस्थ कामात रस नसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली.