पालकमंत्र्यांनी स्वीकारला पुरस्कार
नाशिक हे देशात आरोग्य सुविधांबाबत उदयोन्मुख शहर बनल्याचा निष्कर्ष ‘इंडिया टुडे’ने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पर्यटन तथा सार्वजनिक  बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी हेल्थ केअरमधील ‘इमर्जिग सिटी’ म्हणून नाशिकचा तर ‘एंटरटेन्मेंट’मध्ये नागपूर शहराचा पुरस्कार केंद्रीय विकासमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे स्वीकारला. नवी दिल्लीत सायंकाळी विविध श्रेणींतील ‘बेस्ट सिटी २०१३’ या पुरस्कारांचे वितरण झाले. ‘इंडिया टुडे’ने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील नाशिक व नागपूर ही शहरे अनुक्रमे ‘बेस्ट इमर्जिग सिटी इन हेल्थ केअर’ आणि ‘एंटरटेन्मेंट’ या श्रेणीत सर्वोत्तम ठरली आहेत. सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, पर्यावरण, गुन्हे आणि सुरक्षा, सार्वजनिक सुविधा आर्थिक उलाढाल-गुंतवणूक आणि सर्वोत्तम शहर अशा वर्गीकरणातून विविध शहरांची निवड केली आहे. चेन्नईला सर्वोत्तम शहर तर बडोद्याला सर्वोत्तम उदयोन्मुख शहर असा सन्मान दिला गेला आहे. विविध राज्यांचे सचिव, वरिष्ठ मंत्री, महापौर, मुख्य सचिव यांनी हे पुरस्कार स्वीकारले. ‘इंडिया टुडे’ने यंदापासून या उपक्रमाची सुरुवात केली असून दरवर्षी सर्वेक्षण करून हे पुरस्कार दिले जाणार आहेत.