सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक, शेती, पायाभूत सुविधा, यात्रा, कुंभमेळा अशा वैविध्यपूर्ण अंगांनी काढलेल्या नाशिक जिल्ह्यातील छायाचित्रांचा समावेश असलेल्या ‘नाशिक’ या कॉफी टेबल स्वरूपातील पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुंबई येथे विधानभवनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. किशोर अहिरराव यांनी काढलेल्या सुमारे २६० छायाचित्रांचा या पुस्तकात समावेश आहे. काही दुर्मीळ छायाचित्रे ब्रिटिश लायब्ररीकडून तर काही छायाचित्रे जुन्या संग्रहालयातून मिळवून त्यांचाही समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकातील माहिती माजी जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी दिली आहे, तर हैदराबादच्या प्रगती प्रेसद्वारे त्याची छपाई करण्यात आली आहे. कॉफी टेबल बुक स्वरूपाचे व केवळ छायाचित्रांद्वारे नाशिकची माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक असून, पुस्तकाचे मुखपृष्ठ मेटॅलिक पेपरमध्ये आहे. प्रकाशनानंतर हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.