अडसूळ व त्यांच्या स्वीय सहायकासह चार जणांवर गुन्हा

अमरावती : खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यातील संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. आता रवि राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांनी अडसूळ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अडसूळ यांच्या सांगण्यावरून त्यांचे स्वीय सहायक आणि इतर सहकाऱ्यांनी चारित्र्यहनन, १ कोटी रुपयांची खंडणी, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नवनीत राणा यांनी या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी  राजापेठ पोलिसांनी अडसूळ यांच्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत.

नवनीत राणा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आपले जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत मुंबई येथील जातपडताळणी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल नोव्हेंबर २०१७ मध्ये लागला. जातवैधता प्रमाणपत्र सत्य असल्याचे सिद्ध झाले, पण या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना जयंत वंजारी यांनी वारंवार समाज माध्यमांवर या प्रकरणाशी संबंधित न्यायालयात दाखल केलेले गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक केले. समाजात आपली बदनामी केली आणि चारित्र्यहनन केले. वंजारी यांनी रवि राणा यांच्या दोन भ्रमणध्वनीवर अनेकदा संपर्क साधून १ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर समाज माध्यमांवर बदनामी करू, अशी धमकी दिली. जयंत वंजारी, अडसूळ यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव आणि कार्तिक शहा यांनी वेगवेगळया क्रमांकावरून आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि अश्लील शिवीगाळ केली. रवि राणा यांना  जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुनील भालेराव यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि निवडणूक लढवल्यास संपूर्ण परिवाराला संपवून टाकू, अशी धमकी दिली, असे नवनीत राणा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त येसूदास गोरडे हे करीत आहेत.

नवनीत राणांची तक्रार खोटी- अडसूळ

नवनीत राणा यांच्या खोटय़ा तक्रारीवरून पोलिसांनी माझ्यावर आणि सहकाऱ्यांवर दबावाखाली गुन्हे नोंदवले आहेत. अशाच स्वरूपाची खोटी तक्रार गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नोंदवून माझ्या १३ मराठा व इतर सहकाऱ्यांवर  खोटे अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवले होते.  तो गुन्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ४ मार्च २०१६ रोजी खारीज केला आहे. अनुसूचित जाती आयोगाच्या ताज्या निर्णयामुळे हतबल झालेल्या रवि राणांनी सूडाच्या भावनेतून पत्नीला खोटी तक्रार करण्यास सांगितले, अशी प्रतिक्रिया आनंदराव अडसूळ यांनी दिली.