राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सध्या त्यांचं स्वागत करत आहेत. पक्षातील नेते, कार्यकर्ते अजित पवारांचे आभार मानत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनी भाजपासोबत जाणं शरद पवारांची खेळी होती असा दावा केला जात आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच शरद पवारांनी अजित पवारांना भाजपाला पाठिंबा देण्यास सांगितलं असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. मात्र हे सर्व दावे समर्थकांकडून करण्यात येत असून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर फेसबुकवरही अनेकांनी पोस्ट शेअर करत आपलं मत प्रदर्शन केलं. यामधील एक पोस्ट अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या एका फेसबुक पेजवर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं”.

ही पोस्टदेखील व्हायरल होत असून अनेकजण शेअर करत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांनी भाजपाविरोधात मोठी खेळी केल्याचा दावा केला जात आहे.

अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांना यामागे तुमचा हात असल्याचं बोललं जात असल्याचं बोललं जात आहे प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांना अजित पवारांसंबंधी विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं आहे असं सांगत सूचक विधान केलं होतं.

देशभरात चर्चा फक्त अजित पवारांचीच, शरद पवार अन् फडणवीसांनाही टाकलं मागे
मागील चार दिवसांपासून देशभरामध्ये केवळ आणि केवळ अजित पवार यांची चर्चा असल्याचे गुगल ट्रेण्डवरुन दिसून येत आहे. शनिवारपासून अजित पवार यांचे नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांपेक्षा अधिक सर्च झाल्याचे दिसून येत आहे.

गुगल ट्रेण्डनुसार शनिवारी सकाळी साडेसातपासून अजित पवार यांच्याबद्दल सर्च होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत सतत अजित पवार यांचे नाव सर्च होत असल्याचे दिसत आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत अजित पवारांचे नाव अधिक सर्च झाल्याचे दिसते. मेघालय, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, सिक्कीम, गोवा, केरळ, आसामसारख्या राज्यांमधूनही अजित पवार यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च झालं आहे. महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्याबद्दल ४३ टक्के सर्च झाले. शरद पवारांबद्दल ३९ टक्के आणि फडणवीस यांच्याबद्दल १८ टक्के सर्च झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिझोरमसारख्या राज्यामध्ये फक्त अजित पवारांबद्दल सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्ड सांगत आहे. गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटकमधूनही अजित पवारांबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.