सुनील तटकरेंची टीका

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर गेल्या चार वर्षांच्या सत्ता काळात ज्या भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला अपमानाची व दुय्यम दर्जाची वागणूक दिली, तोच भाजप आता स्वत:साठी धोक्याची घंटा वाजू लागल्याने शिवसेनेसमोर पायघडय़ा घालत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

सोलापूर महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तरी पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विकोपाला गेलेल्या गटबाजीमुळे महापालिकेचा कारभार करणे भाजपला अजिबात जमेनासे झाले आहे. गेल्या वर्षभरात एकूण १६ सर्वसाधारण सभांपैकी तब्बल १३ सभा विनाकारण तहकूब झाल्या. भाजपला कारभारच करता येत नसल्यामुळे सोलापूरचा विकासच खुंटला आहे. या प्रश्नावर आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

भाजपच्या सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सोलापुरातत आले होते. या भेटीत तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे व शहराध्यक्ष भारत जाधव आदी उपस्थित होते.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडून गेलेले नेते आता पुन्हा पक्षात परतण्यासाठी उत्सुक आहेत. त्या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. योग्यवेळी त्यांची ‘घर वापसी’ होईल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कधीही होणार असल्या तरी त्यांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी सज्जआहे, असा दावाही त्यांनी केला.