दलित आणि मुस्लिमांना चळवळीसोबत जोडून घेण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याऱ्या नक्षलवाद्यांनी आता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात पुन्हा नवे डावपेच आखणे सुरू केले आहे. पोलीस व प्रशासनाकडून होणाऱ्या कथित अत्याचाराला बळी पडणाऱ्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे धोरण नक्षलवाद्यांनी आखल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
गेल्या तीस वर्षांपासून मध्य भारतातील जंगलात दबदबा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना आता शहरी भागात चळवळीची व्याप्ती वाढवण्याचे वेध लागले आहेत. आजवर जंगलातील आदिवासींना सोबत घेणाऱ्या नक्षलवाद्यांना या विस्तारासाठी समाजातील पीडित घटकांना सोबत घेण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. त्यातूनच दलित आणि मुस्लिमांना सोबत घेण्याची रणनीती या चळवळीने गेल्या काही वर्षांपासून आखली आहे.
दलित व मुस्लीम समाजातील विचारवंतांना चळवळीच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या संघटनांच्या व्यासपीठावर आणून बौद्धिक चर्चाच्या माध्यमातून या वर्गाला जवळ करण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौच्या एका संस्थेने चंदीगढमध्ये जातिप्रश्न व मार्क्स या विषयावर घेतलेला परिसंवाद याच प्रयत्नाचा एक भाग होता असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
पंजाब व उत्तर प्रदेशात या चळवळीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला व त्यात जाणीवपूर्वक डॉ. आंबेडकरांवर टीका करण्यात आली. नक्षलवादी या देशाची लोकशाहीची चौकट व घटना मान्य करायला तयार नसल्यामुळेच हा टीकेचा उपद्व्याप करण्यात आला, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
केवळ चंदीगढच नाही तर इतर ठिकाणीसुद्धा असे कार्यक्रम घेण्याचा सपाटा नक्षलवाद्यांच्या समर्थकांनी सुरू केला असून यात हमखास खरलांजी हत्याकांडाचा विषय उपस्थित केला जात आहे. दलितांना चळवळीसोबत जोडण्यासाठीच हे प्रकार केले जात असल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपूर्वी नागपूरजवळ कामठीला एका प्रार्थनास्थळावरून दलित व मुस्लिमांमध्ये दंगल झाली. या दंगलीनंतर नक्षलवाद्यांच्या समर्थकांनी लगेच कामठीला धाव घेतली व या दोन्ही समाजातील नेत्यांची बैठक घेऊन भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न केले. आता एकत्र येण्याची वेळ आली आहे तेव्हा भांडणे मिटवा, असा सल्ला या बैठकीमधून देण्यात आला.
मुस्लिमांच्या बाबतीतसुद्धा नक्षलवाद्यांनी हेच धोरण राबवणे सुरू केले आहे. गेल्या वर्षी नक्षलवाद्यांच्या समर्थकांनी हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. काही दिवसांपूर्वी अबूजमाडच्या जंगलात झालेल्या गुप्त बैठकीत नक्षलवाद्यांनी प्रथमच अल्पसंख्याकांना सोबत घेण्याची भाषा वापरली. नक्षलवाद्यांची चळवळ माओच्या विचारावर आधारित आहे. त्यात धर्माला किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या जिहादाला स्थान नाही. मात्र सर्व फुटीरतावादी चळवळींना एकत्र आणण्याचा प्रयोग नक्षलवाद्यांनी आता सुरू केल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दहशतवादी कारवायातील सहभागाच्या संशयामुळे मुस्लिमांकडे वेगळय़ा नजरेने बघितले जाते. यातून आलेल्या असुरक्षेचा लाभ घेण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2013 रोजी प्रकाशित
दलित-मुस्लिमांना जोडण्यासाठी नक्षलवादी कार्यक्षेत्रात नवे डावपेच
दलित आणि मुस्लिमांना चळवळीसोबत जोडून घेण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याऱ्या नक्षलवाद्यांनी आता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात पुन्हा नवे डावपेच आखणे सुरू केले आहे. पोलीस व प्रशासनाकडून होणाऱ्या कथित अत्याचाराला बळी पडणाऱ्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे धोरण नक्षलवाद्यांनी आखल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
First published on: 29-03-2013 at 03:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New dodge in naxalite areas to attach dalits muslims