एका बाजूला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांबरोबर स्पर्धा करीत असताना त्यातून टिकून राहणारी वृत्तपत्रे तग धरून वाटचाल करीत पुन्हा अभिजात पत्रकारितेकडे वळतील. येत्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पाहावयास मिळेल, असा विश्वास ‘लोकसत्ता’चे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांनी व्यक्त केला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी रंगा वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कार डॉ. टिकेकर यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. याच वेळी बाबूराव जक्कल स्मृती पत्रकारिता जिल्हास्तरीय पुरस्कार पत्रकार रवींद्र देशमुख यांना प्रदान करण्यात आला. रंगा वैद्य स्मृती पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. तर बाबूराव जक्कल स्मृती पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या समारंभास आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  रंगा वैद्य यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार तोदेखील सोलापुरात स्वीकारताना अभिमान वाटला, अशा शब्दांत डॉ. टिकेकर यांनी पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  समाजातील प्रत्येक घटकाची विश्वासार्हता संपुष्टात येत असताना पत्रकारिता त्याला अपवाद नाही. ही विश्वासार्हता परत मिळवायची असेल तर आचारसंहितेची चौकट ठरवून घेतली पाहिजे, असेही मत डॉ. टिकेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. गो. मा. पवार यांनी रंगा वैद्य यांच्या पत्रकारितेचा गौरव करताना त्यांच्या नावाचा पुरस्कार डॉ. अरुण टिकेकर यांना दिल्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघाला धन्यवाद  दिले.