प्रचंड गर्दी, असंख्य स्टॉल, चविष्ट खाण्याचे प्रकार, विविध ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम अशा असंख्य बाबींमुळे प्रत्येक दिवशी या महोत्सवास तुफान गर्दी होत असून, हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक व पर्यटकांची नेहमीच वर्दळ दिसून येते. आमदार मीनाक्षी पाटील यांच्या सूनबाई जिल्हा परिषद सदस्या चित्रा आस्वाद पाटील यांची ही अभिनव संकल्पना सायंकाळच्या वेळी हजारो लोकांना खारेपाट महोत्सवास नेण्यास भाग पाडत आहे. खारेपाटच्या विभागात नागोठणे, रेवस ते मांडवा, पोयनाड अशी असंख्य गावे येतात. खारेपाट महोत्सवाचे ठिकाण अगदी कल्पकतेने तीनवीरा-द्रोणागिरी या मध्यभागी निवडल्याने संपूर्ण खारेपाट ग्रामस्थ येथे चालणाऱ्या विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद लुटत आहेत. २४ एकरचा भव्य-दिव्य परिसर, यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, ना. ना. पाटील प्रवेशद्वार, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत, कोकणातील पारंपरिक खालुबाजाने करणे, अगदी प्रवेशद्वारासमोरच गणरायाची मूर्ती, भव्य-दिव्य रबरी कोंबडा अशा व अनेक गोष्टींची सुयोग्य रचना या ठिकाणी दिसून येते. या महोत्सवात एकूण १२० गाळे विविध दुकानधारक, त्यापैकी ६५ स्टॉल महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. या महोत्सवात पूर्वजांपासून चालणारे कासार, लोहार, सुतार, पाथरवट, गोसावी, चर्मकार आदींचे व्यवसाय, मिठागरे, कोळी लोकांच्या अंगणातील तुळस व कोळी नृत्य, मलखांब, आदिवासी लोकांचा बाजार व त्यांचे नृत्य, एकपात्री अभिनय स्पर्धा, द्विपात्री अभिनय स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, अशा व अनेक गुणधर्मानी या महोत्सवास रंगत आली आहे. दिनांक २१ ते २५ डिसेंबर या दरम्यान या महोत्सवास सुरुवात झाली. या महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी स्थानिक नागरिकांनी हजारोंच्या संख्येने भेटी दिल्या आहेत. रविवार दिनांक २३ डिसेंबर रोजी अलिबाग येथे पर्यटकांची संख्या जास्त असल्याने या महोत्सवास साठ हजार प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. तर सोमवार दिनांक २४ डिसेंबर रोजी अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमासाठी ४० हजारांच्या वर प्रेक्षकांची उपस्थिती होती.
या एकंदर संकल्पनेच्या मुख्य सूत्रधार जिल्हा परिषद सदस्या- चित्रा आस्वाद पाटील यांना आमच्या प्रतिनिधीने खारेपाट महोत्सवाच्या संकल्पनेबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, अनेक ठिकाणचे मी पर्यटन महोत्सव पाहिलेले आहेत. यामध्ये शहरी स्त्रियांना वाव दिला जातो, पण ग्रामीण भागातील महिलांना स्थान देण्याच्या उद्देशाने सर्व बचत गटांना एकत्र करून त्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळावी यासाठी अल्पदरात येथे स्टॉल देण्यात आले आहेत. प्रत्येक दिवशी कमीत कमी एका स्टॉलचा धंदा १५ ते २० हजार रुपयांचा होत आहे. ग्रामीण महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. अलिबाग-मुंबई या प्रमुख हायवे व स्थानिक नागरिकांना जवळ पडणारे ठिकाण आम्ही निवडले आहे. प्रत्येक दिवशी २० हजार लीटर पाणी व स्वच्छतेसाठी १६ महिलांची नियुक्ती केली आहे. या महोत्सवास जे. एस. डब्ल्यू. स्टील कंपनी, शापूरजी पालनजी कंपनी, आर. डी. सी. सी. बँक आदींचे सहकार्य लाभले आहे. या महोत्सवास आमदार जयंत पाटील, आमदार मीनाक्षी पाटील, पंडितशेठ पाटील व असंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्यानेच आपण यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.