रत्नागिरी : आम्ही आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मर्यादा राखून बोललो. पण आमचे दैवत नारायण राणे यांच्यावर कोणी बेछूटपणे आरोप करत असेल तर आम्हालाही ठाकरे घराण्याचे काळे सत्य सांगावे लागेल. तेव्हा ठाकरे घराण्याची अब्रू वाचवायची असेल तर आपल्या औकातीत राहा, अशा शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना फटकारले.

नारायण राणे यांनी आत्तापर्यंत नऊ खून पचवले असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी तालुक्यातील वाटद येथे गेल्या शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केला. त्यावर अतिशय आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देताना नीलेश राणे म्हणाले की, आम्ही आजपर्यंत कधी ठाकरे घराण्याच्या इतिहासात शिरलो नव्हतो. तसे करायचे असेल तर इतिहास दोन्ही बाजूंना असतो. अशा वेळी माझ्यासाठी बाळासाहेब नव्हे, तर राणेसाहेब महत्त्वाचे आहेत. त्यांचा कोणी जाहीर कार्यक्रमात अपमान करत असेल तर बाळासाहेबांच्या कारकिर्दीतील काळे सत्य व्यासपीठावरून आम्ही जाहीरपणे सांगू. ठाकरे घराण्याची अब्रु वाचवायची असेल तर आजच सावध व्हा.जयदेव ठाकरे न्यायालयात बोलले ते सांगायला लावू नका. ते सांगितले तर स्मारक सोडा, ठाकरे कुटुंबाच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असा इशारा देऊन नीलेश पुढे म्हणाले की, आनंद दिघेचे काय झाले, कट कसा रचला गेला. त्यांचा मृत्यू रूग्णालयात झाल्याचे कसे दाखवले गेले, तो प्रकार सहन न झालेल्या दोन शिवसनिकांना कसे संपवले गेले, सोनू निगमला ठार मारण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. काय नाते होते निगम आणि ठाकरे घराण्याचे? ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्महाऊसवर कोण कोण हजेरी लावत असे, या सर्व बाबी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होते. कारण राणेंचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते. पण गल्ली-बोळातील गटरछाप बोलायला लागले तर आम्ही गप्प बसणार नाही.

अशा प्रकारे खासदार राऊत यांना थेट इशारा देत असतानाच आमदार उदय सामंत यांचा रस्त्यांच्या बांधकामांमधील भ्रष्टाचारही लवकरच बाहेर येईल, असेही नीलेश यांनी नमूद केले.