scorecardresearch

नव्या वादानंतर निवृत्ती महाराज इंदुरीकरांचा मोठा निर्णय; यापुढे कीर्तनाच्या कार्यक्रमात…

युट्यूबर्ससंदर्भात निवृत्ती महाराज इंदुरकरांनी अकोल्यातील केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झालाय.

nivrutti maharaj kirtan
बीडमधील कार्यक्रमानंतर घेतला निर्णय (फोटो फेसबुकवरुन साभार)

अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनादरम्यान केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरुन सातत्याने वाद होत असल्याने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका करताना वापरलेल्या शब्दांवरुन नवीन वाद निर्माण झाल्यानंतर आता यापुढे कीर्तनाच्या ठिकाणी मोबाईल बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यापुढे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला जाणाऱ्यांना मोबाईल सोबत नेता येणार नाहीय. सोमवार आणि मंगळावर अशा सलग दोन दिवस मोबाईल न वापरण्यासंदर्भात कीर्तनादरम्यान वारंवार विनंती करुनही अगदी दम दिल्याप्राणे मोबाईल बंद करण्यास सांगावं लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.

सोमवारी काय घडलं अन् नवा वाद कशावरुन?
अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. इंदुरीकर महाराजांनी या कीर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला. “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच कीर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले. इतकच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही वक्तव्य केलं.

मोबाईलवरुन सलग दोन दिवस वाद…
सोमवारच्या या कीर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकलं. व्हिडीओ काढू नका असं त्यांनी अनेकदा सांगितलं. संपूर्ण कीर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला. या प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्यांचं बीडमधील धारुक तालुक्यातील कासारी बोडखा गावात कीर्तन होतं. मात्र यावेळीही त्यांनी मोबाईलवर शुटींग करणाऱ्यांना विरोध करत मोेबाईल बंद करण्यास सांगितला. अगदी दम देणाऱ्या स्वरामध्ये इंदुरीकर महाराजांनी मोबाईल बंद करा असं उपस्थितांना सांगितलं.

मोबाईलबंदीचा निर्णय
सलग दोन दिवस असाच प्रकार झाल्याने आता यापुढे आपल्या कार्यक्रमांना मोबाईलबंदी असेल असा निर्णय इंदुरीकर महाराजांनी घेतल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलंय. त्याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमांमध्ये यापुढे कॅमेराबंदीही असेल. अनेकदा इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनादरम्यानच्या व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि ते अडचणीत अडकतात. त्यामुळेच आता ही बंदी घालण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

यापूर्वीही वादात अडकलेत इंदुरीकर महाराज…
इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वादात अडकले आहेत. २०२० साली एका कीर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली.

याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधील घोटी येथील कार्यक्रमादरम्यान करोनासंदर्भात वक्तव्य करताना आपण लस घेतली नाही आणि घेणार ही नाही असं म्हटलं होतं. “मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं. 

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही केलेलं वादग्रस्त वक्तव्य…
तसेच महिन्याभरापूर्वी इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात माळा काढणाऱ्यांसाठीच करोनाची तिसरी लाट आहे असं म्हटलं होतं. यावरुनही बराच वाद झाला होता. “दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के कीर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार,” असं इंदुरीकर म्हणालेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nivrutti maharaj indurikar decided to ban mobiles cameras in his program as clips goes viral to creat controversies scsg

ताज्या बातम्या