नाशिक व नगर जिल्हय़ांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत शुक्रवारी दुपारी लक्षणीय वाढ झाली. दुपारी दोन वाजता धरणात ८५.१० दलघमी पाणीसाठा तयार झाला. वरची धरणे भरल्याने नांदूर मधमेश्वर येथून डाव्या व उजव्या कालव्यांतून खरिपासाठी पाणी वळविण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर डाव्या कालव्यातून ३००, तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. शिर्डी, कोपरगाव व राहाता तालुक्यांना या पाण्याचा फायदा होईल.
दरम्यान, मराठवाडय़ात अजूनही मोठा पाऊस झाला नसल्याने धरणांमधील पाणीसाठय़ात फारशी वाढ झाली नाही. मात्र, नगर व नाशिक जिल्हय़ांत पडलेल्या पावसामुळे वरून सोडण्यात येत असलेल्या पाण्याने जायकवाडीच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे. २९ हजार ५५० क्युसेक वेगाने नागमठाणे येथे पाणी येत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जायकवाडीचा जलसाठा ६ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पिण्याच्या पाण्याची भ्रांत तशी नव्हतीच.
नव्याने आवक झाल्याने औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त निकाली निघाल्याचे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात. औद्योगिक क्षेत्राला केला जाणारा पाणीपुरवठा व उपलब्ध पाणी याचे गणित घातल्यास पाणीकपातीची तशी आवश्यकता नाही, असेही जलसंपदाचे अधिकारी सांगतात. राज्य औद्योगिक विकास महामंडळाने अलीकडेच १५ टक्के पाणीकपात केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले होते. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यातून दिले जाणारे पाणी नक्की कोणत्या कारणासाठी, याची माहिती जलसंपदा विभागात नाही. खरिपाची पिके वाचविण्यास आवर्तन दिले असू शकेल, असे अधिकारी सांगतात.
धरण भरल्यानंतर कालवे सुरू करण्याचा प्रकार नेहमीच घडतो. मात्र, त्या विरोधात मराठवाडय़ातील कार्यकर्ते आक्रमक असतात. या अनुषंगाने विचार करण्यासाठी मराठवाडा पाणी संघर्ष समितीची बैठक उद्या (शनिवारी) स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात होणार आहे, तर भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या वतीनेही उद्या याच विषयावर चर्चा होणार आहे.
मराठवाडय़ातील धरणे व पाण्याची टक्केवारी
जायकवाडी ४.७०
निम्म दुधना ३०.१३
येलदरी ३९.३३
विष्णुपुरी १४.०४
मनार २३.३४
शहागड बंधारा ७.००
खडका बंधारा १६.१९
सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सीना कोळेगाव ० टक्के.